मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयावर विरोधपक्ष नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न केले आहेत. शिवाय, मुख्यमंत्री महोदय तुम्ही आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“मेट्रो कारशेडसाठी आघाडी सरकारच्या समितीनेच कांजूरची जागा नाकारली, या जागेत वन आणि कांदळवन आहे, तसेच कारशेड शिफ्ट केल्याने तांत्रिक अडचणी वाढणार, खर्च वाढणार,प्रकल्पाला विलंब होणार तरीही हट्ट का? मुख्यमंत्र्यांना याची उत्तरे द्यावी लागतील!” असं शेलार यांनी ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटसोबत शेलार यांनी एक व्हिडिओ देखील जोडला आहे. ज्यामध्ये त्यांनी, “ मुख्यमंत्री महोदय तुम्ही आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. तुम्हीच नेमलेल्या तज्ज्ञ समितीने तुम्हाला त्या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून जो अहवाल दिला. त्या अहवालामध्ये मेट्रो ३ व ६ दोन्हींना मिश्र करून एकत्रित चालवणं कठीण आहे, हे स्वत: तज्ज्ञ समिती म्हणते. तरीही आपण हा निर्णय का केला?” असा प्रश्नं केला आहे.

तसेच, “आपल्याला याचेही उत्तर द्यावे लागेली की ज्या ठिकाणी कांजुरमार्गला आपण कारशेड प्रस्तावित करता, ती कांदळवनाची जागा दलदलीची जागा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल. तरीही पर्यावरणाला त्रास देणाऱ्या कांजुरमार्गच्या जागेची आपण का निवड केली? आर्थिक भुर्दंड तर मुंबईकरांवर येईलचं, परंतु मेट्रो-६ चं काम ताताडीनं थांबेल आणि मेट्रो-३ चं काम ७६ टक्के पूर्ण झाल्यावर देखील, परिपूर्ण व्हायला वेळ लागेल. असा दिरंगाईचा निर्णय आपण का घेतला ते सांगा.” असे देखील शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले.

“जो पर्यावरणाला ऱ्हासदायक आहे. आर्थिकदृष्ट्या तोट्याचा आहे. जो शक्यतो होऊच शकत नाही. ज्याचा डीपीआर नाही, तांत्रिक अहवाल नाही. अशा पद्धतीचा निर्णय़ घेऊन मुंबईकरांना वेठीस का धरलं? मुख्यमंत्री उत्तर द्या.” असं शेलार यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.