गुणवत्ता तपासणी पद्धत सदोष असण्याची शंका

२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात निकृष्ट बुलेटप्रुफ जॅकेटमुळे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा बळी गेल्यानंतरही पोलिसांना सध्या पुरविण्यात आलेल्या बुलेटप्रुफ जॅकेटच्या दर्जाबाबत संभ्रम कायम आहे. राज्य पोलिसांना अलीकडे मिळालेल्या तीन हजार बुलेटप्रुफ जॅकेटच्या गुणवत्तेबाबत कोणी अधिकारी ठामपणे काहीही सांगू शकत नाही. या बुलेटप्रुफ जॅकेटची गुणवत्ता तपासण्याच्या पद्धतीमुळेच दर्जाबद्दलचा संभ्रम कायम राहणार आहे.

राज्य पोलिसांना पाच हजार बुलेटप्रुफ जॅकेटच्या खरेदीसाठी गृहखात्याने १७ कोटी रुपये मंजूर केले. मात्र सीमाशुल्क करात सूट न मिळाल्याने अखेर राज्य पोलिसांना पाच हजारऐवजी ४६३४ बुलेटप्रुफ जॅकेटवर समाधान मानावे लागले. त्यापैकी १४३४ जॅकेट परत पाठविण्यात आली आह्रेत. ही जॅकेटस् गुणवत्ता तपासणीत उत्तीर्ण झाली नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. एके ४७ रायफलने या जॅकेटवर गोळीबार करण्यात आला तेव्हा बंदुकीच्या गोळ्या या जॅकेटच्या धातूच्या पट्टय़ांतून आरपार गेल्या.  मात्र ही तपासणी करण्याची पद्धत संभ्रम निर्माण करणारी आहे. या तपासणीत पुरवठादाराने पाठविलेल्या सर्वच्या सर्व बुलेटप्रुफ जॅकेटची गुणवत्ता स्पष्ट होऊ शकलेली नाही. मात्र यापैकी काही जॅकेटची तपासणी केल्यानंतरच ती निकृष्ट असल्याचे आढळल्यामुळे ती परत पाठविण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुलेटप्रुफ जॅकेट पुरविण्याचे कंत्राट कानपूर येथील एमकेयू इंडस्ट्रीज या नामवंत कंपनीला देण्यात आले आहे. भारतीय लष्कराला या कंपनीने बुलेटप्रुफ जॅकेट तसेच हेल्मेट पुरविले आहेत. जर्मनीतून ही सामग्री आयात केली जाते. राज्य पोलिसांना ४६३४ बुलेटप्रुफ जॅकेट पुरविण्याचे कंत्राट या कंपनीला देण्यात आल्यानंतर या कंपनीने वेगवेगळ्या साठय़ात ही जॅकेट पुरविली. या जॅकेटची तपासणी केल्याशिवाय ही जॅकेट घ्यायची नाही, असे राज्य पोलिसांच्या खरेदी विभागाचे अतिरिक्त महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी ठरविले. त्यानुसार चंदीगड येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही जॅकेट तपासणीसाठी पाठविण्यात आली. प्रत्येक पुरवठय़ातील पाच ते सहा जॅकेट तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर या साठय़ातील १४३४ जॅकेटच्या साठय़ाबाबत गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला.

ही सर्व जॅकेट परत पाठविण्यात आली आहेत. मात्र तपासणीच्या या पद्धतीमुळे परत पाठविण्यात आलेली सर्वच जॅकेट निकृष्ट आहेत वा स्वीकारण्यात आलेली सर्वच जॅकेट दर्जेदार आहेत, असे ठामपणे सांगता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  ही जॅकेट प्रामुख्याने नक्षलवादी कारवायांच्या परिसरात तसेच शीघ्र कृती दल आणि फोर्स वनच्या कमांडोंना देण्यात येणार आहे. या जॅकेटचा प्रत्यक्षात वापर झाल्यानंतरच त्याचा दर्जा कळून येणार असल्याचे या वरून स्पष्ट झाले आहे.

प्रत्येक जॅकेटची तपासणी करणे शक्य नाही. तसे केले तर प्रत्येक जॅकेट खराब होईल आणि त्याचा वापर करता येणार नाही. पूर्वी १५ ते २० किलो वजनाची जॅकेट होती. नवी जॅकेट सात किलो वजनाची आहेत. या जॅकेटच्या दर्जाबाबत तपासणीची हीच पद्धत आहे. पुरवठादार कंपनी नामांकित आहे. अद्याप त्यांना देयक अदा करण्यात आलेले नाही    – व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, अतिरिक्त पोलीस महासंचालक  (खरेदी आणि समन्वय)