अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला असून, कोकण किनारपट्टीसह अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. तर, मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चक्रीवादळामुळे मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती आणि महापालिका करत असलेले मदत कार्य याबाबत आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मदत कार्याची माहिती घेतली. तसेच, “मुंबईकरांचं जे नुकसान झालं त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही!” असा त्यांनी इशारा दिला आहे.

“मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत! पण जे नुकसान मुंबईकरांचे झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही!” असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

Cyclone Tauktae Updates : तौते चक्रीवादळाने घेतला रौद्रवतार! मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद

तसेच, “तौते चक्रीवादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईकरांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकांशी मी स्वतः भेटून आल्यानंतर व मुंबईत झालेल्या प्रवासानंतर हे लक्षात आलं आहे की, अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पडलेली झाडं व वाहनांचं झालेलं नुकसान, अनेक झोपड्यांची छतं उडून गेली आणि या नुकसानाबरोबरच अनेक ठिकाणी पाणी देखील तुंबलेलं दिसून आलं आहे. आमचे पोलीस व मनपाचे अधिकारी तैनात नक्कीच आहेत, पण पावसाळ्या अगोदर केलेल्या कामांचा बोजावारा व ज्या पद्धतीने मुंबईची तुंबई करून सोडलं आहे. यामधून मनपातील सत्ताधारी व कंत्राटदार यांना पळवाट काढता येणार नाही. म्हणून या सगळ्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, अशी मी त्यांना विनंती केली आहे.” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Tauktae cyclone: चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या तीन विमानांनी मार्ग बदलला—

चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळ चार वाजेपर्यंत बंद करण्यात आलं असल्याने विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. विमानतळ बंद असल्याने मुंबईत लँडिंग करणाऱ्या तीन विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे.