रस्त्यावर शौचालय ठेवू शकत नसल्याचा पालिकेचा दावा

तब्बल ७५० कुटुंबांची वस्ती असलेल्या अंधेरी (पश्चिम) येथील सिद्धार्थनगरमधील रहिवाशांना नाइलाजाने उघडय़ावरच प्रातर्विधी उरकावे लागू नये म्हणून पालिकेने वस्तीबाहेर फिरते शौचालय उपलब्ध केले. मात्र अवघ्या आठ दिवसांतच फिरते शौचालय वस्तीबाहेरून गायब झाल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला दाखवण्यासाठी हे शौचालय उभारण्यात आले होते. या पथकाची पाठ फिरताच शौचालयही गायब झाल्याचा आरोप होत आहे. तर, रहिवाशांच्या तक्रारीमुळेच शौचालय हटवल्याचा पालिकेचा दावा आहे.

अंधेरी (पश्चिम) येथील चार बंगला परिसरातील ‘म्हाडा’ कॉलनीजवळील सिद्धार्थनगरमध्ये तब्बल ७०० ते ७५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत या वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय पालिकेने २०१६ मध्ये घेतला होता. मात्र उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळू न शकल्याने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पालिकेला करता आले नाही. हा प्रश्न अद्यापही सुटू शकलेला नाही. या वस्तीच्या शेजारून नाला जात असून काही रहिवाशांना नाल्यालगत एक सार्वजनिक शौचालय बांधले असून वस्तीतील अनेक जण या शौचालयाचा वापर करतात. मात्र देखभालीअभावी हे शौचालय बकाल झाले असून वस्तीतील लोकसंख्या लक्षात घेता तेथे आणखी काही शौचालये बांधण्याची नितांत आवश्यकता आहे. परिणामी, ‘हागणदारीमुक्त’ झालेल्या मुंबईतील या वस्तीमधील रहिवाशांवर उघडय़ावरच प्रातर्विधी उरकण्याची वेळ ओढवली आहे.

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे अखेर पालिकेने रहिवाशांच्या सुविधेसाठी सिद्धार्थनगरबाहेरील रस्त्यावर १४ ऑगस्ट रोजी फिरते शौचालय उपलब्ध केले. मात्र हे शौचालय वस्तीमधील मोकळ्या जागेत ठेवावे, अशी विनंती करण्यात येत होती. परंतु पालिकेने त्याकडे लक्ष दिले नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. फिरते शौचालय रस्त्यावरच ठेवण्यात आल्यामुळे आसपासच्या सोसायटय़ांमधील रहिवासी आणि पादचाऱ्यांकडून पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे हे फिरते शौचालय पालिकेने २१ ऑगस्ट रोजी वस्तीबाहेरून हटविले. अचानक शौचालय गायब झाल्यामुळे रहिवासी गोंधळात पडले. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत एक पथक मुंबईमधील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी मुंबईत आले होते. पाहणी करून हे पथक मुंबईतून दिल्लीला रवाना झाले. पथकाचे मुंबईतील येणे, पालिकेकडून सिद्धार्थनगरबाहेर फिरते शौचालय ठेवणे, अवघ्या आठ दिवसांत तक्रारी येताच फिरते शौचालय गायब होणे या घटनांमुळे रहिवासी गोंधळून गेले आहेत. या शौचालयाबद्दल तक्रार करण्यात आल्यामुळे तीन दिवस रहिवाशांना वापरच करता आला नाही.

रहिवाशांच्या सुविधेसाठी सिद्धार्थनगरबाहेर फिरते शौचालय ठेवण्यात आले होते. मात्र रस्त्यावर ठेवलेल्या फिरत्या शौचालयाबद्दल अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे शौचालय तेथून हटवावे लागले. वस्तीमध्ये योग्य ती जागा मिळताच तेथे फिरते शौचालय उपलब्ध करण्यात येईल.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालय

वस्तीतील लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध शौचालय अपुरी आहेत. त्यामुळे रहिवाशांना उघडय़ावरच प्रातर्विधी उरकावे लागतात. असे असतानाही मुंबई हागणदारीमुक्त म्हणून जाहीर करण्यात आली असून हे एक मोठे आश्चर्यच आहे.

– सीताराम शेलार, निमंत्रक, पाणी हक्क समिती