News Flash

मालिकांच्या निर्मितीचा खर्च २० ते २५ टक्क्यांनी वाढला

निर्बंधांच्या या काळात प्रेक्षक गमावण्याचे आव्हान समोर असल्याने वाहिन्यांनी चित्रीकरणात खंड पडू दिलेला नाही.

|| रेश्मा राईकवार

चित्रीकरणाबरोबरच राहण्या-खाण्याचा खर्च मोठा

मुंबई : राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्याने परराज्यात चित्रीकरण सुरू करणाऱ्या हिंदी-मराठी मनोरंजन वाहिन्या आणि निर्मात्यांचा खर्च २० ते २५ टक्क्यांनी वाढला आहे. मुंबईबाहेर चित्रीकरणाची सोय करताना सेटच्या पुन्हा उभारणीबरोबरच कलाकार-तंत्रज्ञ यांच्या राहण्या-खाण्याचा खर्चही अधिक असल्याने निर्माते हवालदिल झाले आहेत.

निर्बंधांच्या या काळात प्रेक्षक गमावण्याचे आव्हान समोर असल्याने वाहिन्यांनी चित्रीकरणात खंड पडू दिलेला नाही. जुनेच भाग दाखवल्याने प्रेक्षकसंख्या गमावण्याची भीती वाहिन्यांना आहे. मालिकेपासून दुरावलेल्या प्रेक्षकांना पुन्हा नव्याने त्यांच्या आवडत्या मालिके पर्यंत आणणे अवघड असते. शिवाय जाहिरातीचे उत्पन्नही बुडते. हे आर्थिक नुकसान सहन करण्याची वाहिनीची आणि निर्मात्यांचीही तयारी नाही. त्यामुळेच मालिकांमध्ये खंड पडू न देता त्या बाहेरगावी चित्रीकरण करण्यात येत आहेत, अशी माहिती ‘दशमी क्रिएशन्स’चे निर्माते नितीन वैद्य यांनी दिली. मात्र बाहेरगावी चित्रीकरण करताना नेहमीपेक्षा २५ टक्क्याने खर्च वाढला आहे.

खर्चाचे गणित

मराठी मालिके च्या सेटवर साधारणपणे ७० ते ८० कलाकार, कर्मचारी असतात, त्यापैकी किमान ५० तर हिंदी मालिकांच्या सेटवरील किमान शंभर लोकांना बाहेरगावी चित्रीकरणासाठी नेण्यात आले आहेत. या सगळ्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्च मोठा आहे. शिवाय, मुंबईत मालिकांचे जे सेट आहेत ते हातातून जाऊ नयेत यासाठी त्यांची ‘स्टॅण्डिंग कॉस्ट’ही(यात देखभालीच्या खर्चापासून सगळे खर्च समाविष्ट आहेत)द्यावी लागते. ‘मुंबईत असलेल्या सेटसाठी आम्हाला १० ते १२ लाख रुपये स्टॅण्डिंग कॉस्ट भरावी लागते. राज्यात चित्रीकरण होऊ शकत नसल्याने निर्माते आपल्याकडे आले आहेत याची जाणीव असल्याने व्यावसायिकांनी परराज्यातील रिसॉर्ट, हॉटेल्सचे दरही वाढवले आहेत. प्रत्येक भाग चित्रित झाल्यानंतर तो मुंबईला पाठवण्यासाठी इंटरनेट जोडणी लागते. हा इंटरनेट जोडणीचा खर्च मुंबईत ७ ते ८ हजारांच्या आसपास आहे, आता आम्हाला फक्त त्यासाठी ७० ते ८० हजार रुपये मोजावे लागले आहेत’, अशी माहिती ‘आयरिस प्रॉडक्शन’चे विद्याधर पाठारे यांनी दिली.

मराठी मालिकेच्या एका भागासाठी साधारणपणे दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो, तर हिंदीत हाच खर्च १० ते १२ लाख रुपये एवढा आहे. सध्या आम्ही बाहेरगावी चित्रीकरण करत असल्याने एका भागाच्या निर्मितीचा खर्च दुप्पट म्हणजे साधारण चार-साडेचार लाख रुपयांच्या आसपास जातो. याशिवाय, कलाकार-तंत्रज्ञांचा दिवसभरातील दोन वेळचा नाश्ता, जेवणाचा खर्च, त्यांच्या राहण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या हा सगळा वाढीव खर्च असल्याची माहिती पाठारे यांनी दिली. ज्या निर्मात्यांच्या एकाच वेळी दोन ते तीन मालिका सुरू आहेत त्यांच्यासाठी ही तारेवरची कसरत असून खर्च दुप्पट-तिप्पट वाढला आहे. मात्र याही परिस्थितीत वाहिन्या, कलाकार-तंत्रज्ञ आणि आम्ही सगळेच एकमेकांना सांभाळून घेऊन काम करतो आहोत, असे निर्माते विनोद लवेकर यांनी सांगितले.

राज्यात चित्रीकरणास परवानगी मिळावी…

सध्या परराज्यापेक्षा महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे.  त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन, जैवसुरक्षा (बायोबबल) पद्धतीने राज्यात चित्रीकरण करण्याची परवानगी सरकारने दिली. तर निर्मितीचा खर्चही कमी होईल आणि राज्यातील उत्पन्नही बाहेर जाणार नाही, अशी मागणी निर्मात्यांनी केली आहे. जे इतर कलाकार -कामगार बाहेरगावी जाऊ न शकल्याने उपासमार सहन करत आहेत. त्यांनाही काम गमवावे लागणार नाही. सध्या इतर राज्यांत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकार लवकरच निर्मात्यांना पुन्हा राज्यात बोलावून जैवसुरक्षा पद्धतीने चित्रीकरणाची परवानगी देईल, अशी आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:14 am

Web Title: the cost of producing the series increased akp 94
Next Stories
1 टाळेबंदीमुळे कलादालनांतील कलाकृतींना धोका
2 विलगीकरणासाठी रेल्वे डबे नको!
3 नेस्को करोना केंद्रात १५०० नवीन रुग्णशय्या
Just Now!
X