पोटात कोकेन हे अंमली पदार्थ दडवून आणण्याच्या प्रयत्नात टांझानियाच्या एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला, तर दुसरा साथीदार अत्यवस्थ आहे. सोमवारी सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली होती.
सोमवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास दोन परदेशी नागरिक अंमली पदार्थाची तस्करी करून मुंबईला येणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. इथोपियन एअरलाईन्सच्या विमानातून २० ते ४० वर्षे वयोगटातले दोन टांझानियन नागरिक उतरले होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पोटात कोकेन दडवल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अंमली पदार्थाच्या विशेष न्यायालयात हजर करून वैद्यकीय तपासणीची परवानगी घेण्यात आली होती.
या दोन्ही आरोपींना जे.जे. रुग्णालयात नेले जात होते. त्यावेळी एकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्याने सुमारे दोन किलो कोकेने १२० कॅप्सुलमध्ये टाकून पोटात दडवले होते. ते पोटात फुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी सांगितले. त्याचा दुसरा साथीदारावर उपचार सुरू असून त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे.  या दोन्ही नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.