News Flash

पीक कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीतला, सरकारने पुनर्विचार करावा – राजू शेट्टी

"अर्थमंत्री जयंत पाटील यांनी २१ हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचे सांगितले आहे. मात्र, हे शक्यच नाही"

(संग्रहित छायाचित्र)

उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

शेट्टी म्हणाले, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांवर काढलेलं कर्ज फेडणं शक्य नाही. सध्याच्या कर्जमाफीच्या आदेशानुसार, हा शेतकरी थकबाकीदार ठरत नाही तसेच तो हे कर्ज बँकांना परतही करु शकत नाही कारण त्याच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नव्या कर्जमाफी योजनेनुसार, मागील वर्षी जो शेतकरी थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर यंदा ज्यांनी कर्ज काढलं ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी आहेत.

सरकार कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करु शकलेले नाही

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची पिकं गेली ते शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरणार नाहीत. कारण त्यांच्या कर्जाची मुदत जून २०२० साली संपणार आहे. त्यामुळे हे कर्ज थकबाकीत जाणार नाही. त्यामुळे हा शेतकरी नव्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे सरकार सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करु शकलेले नाही. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जांची पूर्ण माहिती न घेता घाईगडबडीत निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे सरकारने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

आणखी वाचा – ‘सरसकट’ शब्द असताना कर्जमाफीत निकष का लावले? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

२१ हजार कोटींची कर्जमाफी शक्यच नाही – शेट्टी

अर्थमंत्री जयंत पाटील यांनी २१ हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचे सांगितले आहे. मात्र, हे शक्यच नाही. कारण, या कर्जमाफीतील अटींमुळे याचा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी ६ ते ७ हजार कोटींच्या पुढे जाणार नाही. ठाकरे सरकारने आणलेल्या कर्जमाफी योजनेतील व्याजासह दोन लाखांची कर्जमाफी आणि या योजनेचा १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ हा कालावधीत या दोन अटी जाचक आहेत.

उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा अध्यादेश काढला आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलं आहे त्यांच्या कर्ज खात्याचं व्याज आणि थकबाकी ही २ लाखांपर्यंत असावी, अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे. तसेच अशा शेतकऱ्यांचे अल्प/अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचं अध्यादेशात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 10:44 am

Web Title: the decision on crop loan waiver is hasty the government should reconsider says raju shetty aau 85
Next Stories
1 ‘सरसकट’ शब्द असताना कर्जमाफीत निकष का लावले? चंद्रकांत पाटील यांचा सवाल
2 कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; काय आहे शासन निर्णय ?
3 “एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणं हे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखण्यासारखं”
Just Now!
X