हवाई गुप्तचर विभागाच्या श्वानपथकातील अ‍ॅनी या कुत्रीच्या सतर्कतेमुळे मुंबई विमानतळावर तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यात यश आले. सीमा शुल्क विभागाची नजर चुकवून जाणाऱ्या एका महिला प्रवाशाकडील अंमली पदार्थ अ‍ॅनीने ओळखले आणि ही तस्करी रोखली गेली.
थालिटा पोटगेईटर (३४) ही दक्षिण आफ्रिकन महिला मंगळवारी सकाळी इथोपियाला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. सकाळी साडेपाच वाजता ती इथोपिया एअरवेजच्या (इटी ६११) या विमानाने अदीस अबाबा येथे जाणार होती. दिल्लीहून ती मुंबईला आली होती आणि येथून ती इथोपियाला जाणार होती. अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली पण त्यांना काही आक्षेपार्ह आढळले नाही. नेमके त्याच वेळेस श्वान पथकातील अ‍ॅनी या लॅब्रॅडॉर जातीच्या कुत्रीने या महिलेच्या दिशेने भुंकायला सुरुवात केली. विशिष्ट पद्धतीने तिने भुंकून अधिकाऱ्यांना संकेत दिले. त्यामुळे हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा थालिटाची कसून तपासणी केली. तिच्या बॅगेत एका कार्ड बोर्डला विशिष्ट कापड गुंडाळलेले होते. त्या कापडाच्या आत एका कॅप्सूलमध्ये तिने १६ किलो इफेड्राईन हे अंमली पदार्थ दडवलेले आढळले. या अंमली पदार्थाची किंमत तब्बल तीन कोटी २० लाख रुपये असल्याचे हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी सांगितले. ही महिला केवळ अंमली पदार्थ नेण्याचे काम करत होती. यामागे मुख्य सुत्रधार वेगळा असल्याचे हवाई गुप्तर विभागाने सांगितले. थालिटाला अटक करण्यात आली आहे.

सहा महिन्यांची अ‍ॅनी
अ‍ॅनी सहा महिन्यांची असून दोनच महिन्यांपूर्वी ती हवाई गुप्तचर विभागाच्या ताफ्यात दाखल झाली होती. अ‍ॅनी ही खास कुत्री असून तिला अंमली पदार्थ ओळखण्याचे खास कसब अवगत आहे. मध्य प्रदेशातील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात तिला प्रशिक्षण देण्यात आले आहे.