घातक एमडीचा अमली पदार्थविरोधी कायद्यात समावेश झाल्यानंतर मुंबईतला पहिला गुन्हा बुधवारी दाखल झाला. अमली पदार्थविरोधी शाखेने एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करून त्याच्याकडून शंभर गॅ्रम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे.
 यापूर्वी एमडी या अमली पदार्थाचा प्रतिबंधात्मक औषधात समावेश नव्हता. नुकताच केंद्राने एमडीचा अमली पदार्थविरोधी कायद्यात समावेश केला आहे. या कायद्यानंतर एमडीचा व्यवहार रोखण्यासाठी मुंबई पोलीस जोमाने कामाला लागले होते. बुधवारी एक इसम जे जे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौलाना आझाद मार्गाजवळ एमडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच अमली पदार्थविरोधी शाखेच्या आझाद मैदान कक्षाने सापळा लावून नजिमुद्दीन इस्माईल शेख ऊर्फ गांधी (३८) याला अटक केली. त्याच्याकडे १०० ग्रॅम एमडी सापडले. नव्या कायद्यानुसार ५० ग्रॅमपेक्षा जास्त एमडी आढळल्यास ते व्यावसायिक वापराच्या हेतूसाठी गृहीत धरले जाते. या अमली पदार्थाची किंमत बाजारात अडीच लाख रुपये आहे. नवीन अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार दाखल झालेला हा पहिला गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.