ऑनलाइन नोंदणीच्या गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी उशीरा पदवी महाविद्यालयांनी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची पहिली कटऑफ यादी जाहीर केली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक विद्याशाखांपेक्षा बीएमएस, अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्स, बीएमएम आदी स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक मागणी आहे. याला अपवाद केवळ अनुदानित महाविद्यालयांचा. पण, खासगी महाविद्यालयातील स्वयंअर्थसाहाय्यित आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या कटऑफमध्ये या वर्षीही चांगलीच तफावत आहे.
दक्षिण मुंबईतील हिंदुजा महाविद्यालयात बीएमएसचे प्रवेश गेल्या वर्षी ८१ टक्क्य़ांना बंद झाले होते. या वर्षी महाविद्यालयाची बीएमएसची पहिली कटऑफ ८५ टक्क्य़ांवर गेली आहे. तर सायन्सची ७० वरून ७१ टक्क्य़ांवर गेली आहे. बीकॉम अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्सची कटऑफ गेल्या वर्षीच्या ८१ टक्क्य़ांवरून ८३ टक्क्य़ांवर गेल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य टी. ए. शिवारे यांनी सांगितले. केवळ अनुदानित महाविद्यालयात शुल्क कमी असल्याने त्या महाविद्यालयांमधील पारंपरिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगली मागणी आहे. उदाहरणार्थ पाल्र्याच्या डहाणूकरमधील बीकॉमची पहिली कटऑफ ७६.१६ टक्क्य़ांवर बंद झाली आहे. तर बीएमएम ७०.५, बॅकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स ६८, अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्सची ७५ टक्क्य़ांवर बंद झाली आहे.
वाणिज्य आणि कला शाखेचा बारावीचा निकाल यंदा चांगला लागल्याने या अभ्यासक्रमांची कटऑफ एकदोन टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. प्रत्यक्षातही एकाददुसऱ्या टक्क्य़ानेच कटऑफ वाढली आहे, अशी प्रतिक्रिया डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी पेठे यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कटऑफमध्ये फारसा फरक नाही, अशी प्रतिक्रिया कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाच्या प्राचार्य चैताली चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. या महाविद्यालयाचा बीकॉमचा कटऑफ स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांपेक्षा कमी गुणांवर बंद झाली आहे.

अजूनही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
ऑनलाइन नोंदणीच्या गोंधळामुळे अजूनही काही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असल्याची भीती व्यक्त होत आहे. संथ व सदोष संकेतस्थळामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत नोंदणी करता आली नाही. त्यामुळे, प्रवेशाची मुदत मंगळावारी दुपारी १.३० पर्यंत वाढविण्यात आली होती. पण, असे असूनही काही विद्यार्थी नोंदणी करू न शकल्याने प्रवेशापासून वंचित राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया एका प्राचार्यानी व्यक्त केली.