कचऱ्यापासून खतनिर्मिती करून करसवलत मिळवणारी पहिली सोसायटी

ओल्या कचऱ्यापासून यशस्वीरीत्या खतनिर्मिती करणाऱ्या मलबार हिल येथील इन्फिनिटी टॉवर या सोसायटीला पालिकेने मालमत्ता करात पाच टक्के सवलत दिली असून, अशा पद्धतीची सवलत मिळविणारी ही पहिलीच सोसायटी ठरली आहे. दरम्यान, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावल्याबाबतचे कागदपत्र सादर केल्यानंतर मालमत्ता करात आणखी पाच टक्के सवलत देण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील २० हजार चौरस मीटरहून अधिक जागेत उभ्या असलेल्या, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या सोसायटय़ांना कचऱ्याचे  वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोसायटय़ांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर पालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जलसंधारण योजना राबविणाऱ्या सोसायटय़ांना मालमत्ता करातील सर्वसाधारण करात प्रत्येकी पाच टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी काही नियम आणि अटी निश्चित केल्या होत्या.

पालिकेच्या या घोषणेनुसार मलबार हिल येथील नारायण दाभोलकर मार्गावरील इन्फिनिटी टॉवरने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केल्याबद्दल मालमत्ता करातील सर्वसाधारण करात पाच टक्के सवलत मिळविली आहे.  या २२ मजली सोसायटीमध्ये ४४ कुटुंबे वास्तव्यास आहेत. सोसायटीमध्ये दर दिवशी ५२ किलो ओला कचरा, १२ किलो सुका कचरा आणि आठ किलो बगीचातील कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोसायटीने आवारामध्ये १०० किलो क्षमतेचा ऑरगॅनिक  वेस्ट कनव्हर्टर बसविला असून दर दिवशी ओल्या कचऱ्यापासून यशस्वीरीत्या खतनिर्मिती करण्यात येत असून या खताचा वापर सोसायटीच्या आवारातील झाडांसाठी करण्यात येत आहे.  पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने सोसायटीत ओल्या कचऱ्यापासून करण्यात येणाऱ्या खतनिर्मितीची पाहणी केली असून खतनिर्मितीबाबत पालिकेच्या निकषांची पूर्तता केल्याबद्दल सोसायटीला मालमत्ता करातील सर्वसाधारण करात पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र सोसायटीमधील सुका कचरा पुनप्र्रक्रियेसाठी पाठविण्यात येत नाही. भविष्यात सुका कचरा पुनप्र्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्यास, त्याबाबचे आवश्यक ते कागदपत्र तपासून सोसायटीला सर्वसाधारण करात आणखी पाच टक्के सवलत देण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरमहा पाहणी

एखाद्या सोसायटीने ही योजना यशस्वीरीत्या राबविल्यानंतर त्यांना सर्वसाधारण करात  पाच टक्के सवलत देण्यात येते. मात्र ही सवलत एक महिन्यापुरती आहे. दर महिन्याला नागरिकांचा  समावेश असलेल्या पालिकेच्या समितीतर्फे या प्रकल्पाची पाहणी करण्यात येणार असून तपासणीत निकषांची पूर्तता झाल्याचे आढळल्यास करामध्ये सवलत देण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्य सोसायटय़ांना आवाहन

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या सोसायटय़ांनी पालिकेशी संपर्क साधावा. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांमार्फत पाहणी केल्यानंतर संबंधित सोसायटीला सर्वसाधारण करामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे ‘डी’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.