मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात बाईक चोरीच्या गुन्ह्यात अनेकदा अटकेची कारवाई केलेला महेश राजाराम येरापल्ले उर्फ सकपाळ या पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी त्याने चक्क फुटबॉलपटूची बाईक लांबविल्याचे चौकशीतून समोर आले आहे. बाईक चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन नंतर तपासाची दिशा ठरवताना महेश येरापल्ले उर्फ सकपाळ याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली.

मुंबई, नवी मुंबई पोलीस ठाण्यात बाईक चोरीच्या गुन्ह्यात आरोपी महेश येरापल्ले उर्फ सकपाळ याला अनेकवेळा अटक करण्यात आलेली आहे. अनेकदा त्याने करावासही भोगला आहे. मात्र, सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर सुटल्यानंतर महेशने बाईक चोरीचा धंदा सुरूच ठेवला. त्याच्यावर मुंबई. नवी मुंबई मधील विविध पोलीस ठाण्यात तब्बल २२ बाईक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याला प्रत्येक गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. दहिसर येथे राहणारा राष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू उमेश रमेश पेराम्बरा यांची दोन दिवसांपूर्वी दहिसर परिसरात फिरण्यासाठी भावाची बाईक घेऊन निघाला होता. दरम्यान, पेराम्बरा यांनी भावाची बाईक शुक्रवारी रात्री त्याच्या सोसायटीजवळ पार्क केली होती. त्यानंतर महेश येरापल्लेने ही बाईक पळविली. त्यानंतर पेराम्बरा याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरु करून सराईत महेश येरापल्लेला ताब्यात घेतले. दरम्यान, या बाईक चोरीत अन्य काही जणांनी त्याला सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.