शहरातील बोगस डॉक्टांराविरोधात पालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांपैकी एक डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नव्हते. बंदी असलेले, हानिकारक औषधे ते रुग्णांना देत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

संजकुमार सिंग (संतोष भुवन), सभजीत गौतम (संतोष भुवन), दुधनाथ यादव (श्रीराम नगर), मनोज गुप्ता (कारगिल नगर), कृष्णचंद्र पाल (संतोष भुवन) आणि रामजित पाल (कारगिल नगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पालिेकेची बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम थंडावली होती. त्यामुळे अनेक बोगस डॉक्टरांनी आपापली दुकाने थाटली होती. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलची परवागनी आवश्यक असते. मात्र, कुठल्याही परवानगी आणि नोंदणीशिवाय हे डॉक्टर व्यवसाय करीत होते. गुरूवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने नालासोपारा येथे डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केली. त्यावेळी ६ बोगस डॉक्टर आढळून आले.

पालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने छापा टाकल्यानंतर या डॉक्टरांचे प्रताप पाहून त्यांना धक्काच बसला. या डॉक्टरांकडे कुठलीच वैद्यकीय शिक्षणाची पदवी नव्हती. त्यांचे शिक्षणही अर्धवट झालेले होते. बंदी असलेली औषधे, रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण कऱणारी इंजेक्शन्स या डॉक्टरांच्या दवाखान्यात आढळून आली. भूल देण्याची घातक औषधेही येथे आढळून आली, अशी माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र चौहान यांनी दिली. या बोगस डॉक्टरांवर तुळीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.