मुंबई : सर्व रंगकर्मी व तंत्रज्ञांचे लसीकरण पूर्ण करून, करोनाविषयक सावधगिरी बाळगून ५ नोव्हेंबर या रंगभूमी दिनापासून राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, असे संके त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रंगकर्मींबरोबरच्या बैठकीत शुक्रवारी दिले.

करोनासंबंधीचे विविध निर्बंध शिथिल होत असताना नाट्यगृहे सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, या मागणीसाठी अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेता-निर्माता सुबोध भावे, दिग्दर्शक विजय केंकरे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अभिनेता-दिग्दर्शक मंगेश कदम, मराठी नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, रंगमंच कामगार संघाचे अध्यक्ष किशोर वेल्हये, दिग्दर्शक विजय राणे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सकाळी ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख व ज्येष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘करोनामुळे नाट्यगृहे बंद असल्याने या क्षेत्राशी संबंधित कलाकार व इतरांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक उद्योग-व्यवसायांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नाटक व लोककलांबाबतही तसाच निर्णय व्हावा. त्यासाठी सर्व कलाकार-तंत्रज्ञांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मोहीम राबवणे व इतर जुळवाजुळवीला थोडा अवधी लागेल. ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिन आहे. त्याचे औचित्य साधून राज्यात नाटक-लोककलांच्या सादरीकरणास राज्य सरकारने परवानगी द्यावी,’ अशी भूमिका शिष्टमंडळातील रंगकर्मींनी मांडली. त्यावर लसीकरणासह सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाणार असेल, तर या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘करोना आणखी काही काळ राहिला, तरी रंगकर्मी व नाट्यरसिकांच्या आरोग्य सुरक्षेची खबरदारी घेऊन नाटक-लोककला सुरू झाल्यास रंगकर्मी, तंत्रज्ञ, लोककलावंत यांच्यासाठी तो मोठा दिलासा ठरणार आहे,’ असे अभिनेते आदेश बांदेकर यांनी सांगितले.

आदेश बांदेकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाली. गेल्या वर्षीही ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनी राज्य सरकारने नाट्यगृहाचे दार उघडले होते. परंतु त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी नाटक रंगभूमीवर आले. म्हणूनच राज्य सरकारने नाट्यगृह सुरू करण्याबाबत लवकर भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. यंदा ५ नोव्हेंबरला पुन्हा नाट्यगृहांचे दार उघडण्याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.  – प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद