‘म्हाडा’च्या सोडतीत घर लागले, कर्ज काढून पैसेही भरले आणि घराचा ताबा मिळणारच होता. पण करोनाचा संसर्ग वाढला आणि पालिकेने आमची घरे म्हाडाकडून विलगीकरणासाठी घेतली. कर्जाचे हप्ते सुरू झाले, पण घर ताब्यात मिळालेले नाही. आता जोपर्यंत घराचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकार किंवा पालिकेने आमच्या कर्जाचे हप्ते भरावे, असे गाऱ्हाणे या मंडळींनी मांडले आहे.

सर्वसामान्य मुंबईकरांना मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाने २०१७ मध्ये परवडणाऱ्या घरांची सोडत काढली होती. मात्र सोडतीत लागलेले घर विविध कारणांमुळे नोव्हेंबर २०१७ ते डिसेंबर २०१९ या काळात संबंधितांना मिळू शकले नाही. मात्र डिसेंबर २०१९च्या अखेर पंधरवड्यात  म्हाडाने संबंधितांना तात्पुरते देकारपत्र दिले. त्यामुळे आनंदी झालेल्या अनेकांनी बँकांकडून गृहकर्ज घेऊन फेब्रुवारी २०२० मध्ये घराचे पैसे भरले. मार्चमध्ये नव्या घरात वास्तव्यासाठी जाता येईल अशी या सर्वाना अपेक्षा होती. मात्र मुंबईत करोनाचा संसर्ग वाढला आणि पालिकेने म्हाडाची तब्बल ९०० घरे विलगीकरणासाठी ताब्यात घेतली. त्यामुळे नव्या घरात वास्तव्यासाठी जाण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले.

म्हाडाने २०१७ मध्ये काढलेल्या सोडतीत भूखंड क्रमांक ३, सेक्टर ८, चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथील संकुलातील चार इमारतींमधील १७६ सदनिकांचा समावेश होता. या घरांची विक्री झाली आहे. मात्र पालिकेने ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा ताबा संबंधितांना देता आला नाही. आता पालिकेने चारपैकी तीन इमारती म्हाडाच्या ताब्यात दिल्या आहेत. चौथ्या इमारतीमध्ये आजही करोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित तीन इमारतींमधील घरांचा ताबा संबंधितांना देण्यास म्हाडाने असमर्थता दर्शविली आहे.

विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्यानंतर उर्वरित एक इमारत म्हाडाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र या चारही इमारतींमधील घरांचा वापर झाला आहे. त्यामुळे सदनिकांमध्ये छोटी-मोठी डागडुजी आणि रंगरंगोटी करावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना या घरांचा ताबा देण्यात येईल, असे म्हाडामधील अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. संबंधितांना फेब्रुवारीपासून गृहकर्जाचे हप्ते भरावे लागत आहेत. घर नक्की कधी ताब्यात मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे विलगीकरणासाठी घेतलेल्या घराच्या कर्जाचे हप्ते राज्य सरकार किंवा पालिकेने भरावे, अशी मागणी होते आहे.

चारकोपमधील चारपैकी तीन विंग पालिकेने म्हाडाच्या ताब्यात दिल्या आहेत. एका विंगमध्ये करोनाबाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. रुग्णांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्यानंतर ही विंग ताब्यात मिळेल. त्यानंतर डागडुजी आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना घरे ताब्यात दिली जातील.
– भगवान सावंत, उपमुख्य अधिकारी (पणन), म्हाडा