आरक्षण संपवणे हा सरकाचा डाव आहे असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरकावर निशाणा साधला. हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुणालाही न घाबरण्याचा सल्लाही दिला. लोकांच्या मदतीसाठी उभे राहा, स्वतःला झोकून द्या असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. अनेक आंदोलनांमध्ये मलाही अटक झाली पण मी डगमगलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांसाठी झोकून कसे द्यायचे असते या संदर्भात त्यांनी स्वतःचा एक किस्सा सांगितला. नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आलो. ई वॉर्ड मधून म्हणजेच भायखळ्यातून निवडून आलो होते तिथे एक मातीचा ढिगारा होता. तो स्वच्छ करण्यासाठी वारंवार महापालिकेकडे पत्र व्यवहार केला. मात्र मातीचा ढिगारा तसाच होता. शेवटी दोन महिने वाट पाहून सगळी माती टेंपोत भरली तो टेंपो महापालिकेजवळ घेऊन गेलो. महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरच्या टेबलवर घमेले भरून माती टाकली. वॉर्ड ऑफिसर म्हणू लागले हे काय करता? तर मी त्यांना उत्तर दिले की मातीचा ढिगारा स्वच्छ करा म्हणून दोन महिने पत्र व्यवहार करतो आहे. मात्र तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तो ढिगाराच इथे आणू टाकला, ही आठवण त्यांनी सांगितली. तसेच त्यानंतर ई वॉर्ड स्वच्छ कसा झाला आणि लोकांनी माझा जयजयकार कसा केला हेदेखील भुजबळ यांनी सांगितले. दर वेळी कायदा हातात घेतला पाहिजे असे नाही. मात्र ‘घी सिधी उँगलीसे नहीं निकले तो उँगली टेढी करनी चाहिये’ हे सूत्र लक्षात ठेवा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले

एवढेच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी एक शेरही सादर केला. हिंमत हरू नका म्हणत भुजबळ म्हटले, ”कश्ती तो उनकी डुबती हैं जिनके इमान डगमगाते हैं जिनके दिलमें नेकी होती है उनके आगे मंजिलेभी सर झुकाती है” आंदोलन करण्याच्या आधी डगमगून जाऊ नका. तुरुंगात गेलो तर सोडवतील कसे याची चिंता बाळगू नका लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडा तर लोक तुम्हाला साथ देतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. मुंबईत अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकांना सहकार्य करा असेही आवाहन छगन भुजबळ यांनी केले. तसेच हे सरकार आरक्षण संपवायच्या तयारीत आहे असाही आरोप यावेळी त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The government wants to end the reservation says ncp leader chhagan bhujbal
First published on: 21-07-2018 at 15:45 IST