गेटवे ऑफ इंडियाकडे तोंड करून उभं राहिलं की आपल्या उजव्या हाताला ताजमहाल हॉटेल, तिथून पुढं जाणाऱ्या रस्त्यावर शेवटी ‘रेडिओ क्लब’. एखाद्या जलदुर्गाचा बुरूज पुढे आलेला असावा तसा हा क्लब गेटवेच्या उजवीकडे दिसतो. आणि डावीकडे दिसतात त्या छोटय़ामोठय़ा फेरीबोटी किंवा लाँच. इथूनच अलिबागकडे – मांडव्याला जाणारी लाँच पकडायची. लाँचसेवेच्याच बसनं मांडवा ते अलिबाग हे अंतर कापताना मध्ये ‘रांजणपाडा’ या गावात उतरायचं. तिथे ‘द गिल्ड’ नावाची गॅलरी आहे. हे खासगी कलादालन मूळचं मुंबईचंच. पण जास्त जागेसाठी इथं आलंय. हे एक बैठं, प्रशस्त कौलारू घरच आहे. त्याच्या तिन्ही मोठय़ा खोल्या म्हणजे दालनं. इथं सध्या प्रदर्शन भरलं आहे ते केरळचे चित्रकार आणि चित्रपटकार  मधुसूदनन् यांचं. जगभरच्या मोठय़ा आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या महाप्रदर्शनांत मधुसूदनन् (वय ६१) यांची चित्रं दिसली आहेत, दिल्लीतही सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ‘वढेरा गॅलरी’नं त्यांचं प्रदर्शन केलेलं आहे.. पण मुंबईतलं, महाराष्ट्रातलं हे त्यांचं पहिलंच एकल प्रदर्शन.

अ‍ॅक्रिलिक रंगांनी रंगवलेले दहा मोठे कॅनव्हास आणि चारकोल व अन्य साधनांनी कागदावर केलेली सुमारे बारा ड्रॉइंग्ज, शिवाय पाचेक मिनिटांची ‘रेझर – ब्लड’ ही फिल्म, असं या प्रदर्शनाचं स्वरूप आहे. या फिल्ममध्ये केशकर्तनालय दिसतं. एकटाच कारागीर-मालक. वयानं पन्नाशीतला. त्याच्याकडे साठी-पासष्टीचं गिऱ्हाईक येतं. दाढी करणारा आणि करवून घेणारा हे पुढली काही मिनिटं या दोघांचं नातं असणार, हे आपण प्रेक्षकही ओळखतोच. पुढे मात्र हेच दोघे आरोपी आणि पोलीस या वेशांत दिसू लागतात. हा बहुधा फ्लॅशबॅक असावा. पण पुन्हा फिल्म वास्तवात येते आणि पुन्हा भलतंच दृश्य सुरू होतं. कारागीर गिऱ्हाइकाचा गळा वस्तऱ्यानं चिरत आहे. गळा पूर्ण चिरला गेल्याची कारागिराची खात्री झाल्यानंतरच हे दृश्य संपतं. पुन्हा फिल्म वास्तवात येते तोवर दाढीकाम आटोपलेलं असतं, गिऱ्हाइकाच्या छाती-खांद्यांवरला टॉवेल काढला जातो.. पुढे काय होतं?

‘पहिलं दृश्य म्हणजे फ्लॅशबॅक, हे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. दुसरं जे दृश्य आहे, ते स्वप्नदृश्य आहे-’ असं मधुसूदनन् सांगतात, त्यावरून जाणकारांना या लघुकथापटाच्या शेवटाचा अंदाज येऊ शकेल. पण, ‘या फिल्ममधला तो जो कारागीर आहे, तो पूर्वी नक्षलवादी होता. आता केशकर्तनालय चालवतो. केरळच्या गावोगावी पुनर्वसन झालेल्या, राजकारण सोडून दिलेल्या माजी नक्षलवाद्यांनी चालवलेली अशी अनेक केशकर्तनालयं आहेत, त्यापैकी हे एक. अशा एका माजी नक्षलवाद्याला, निवृत्त पोलीस त्याच्याकडे गिऱ्हाईक म्हणून आल्यावर आठवलेला भूतकाळ आणि त्यातून शिल्लक राहिलेला विखार, याचं दर्शन माझ्या या कथेत घडतं’ असं मधुसूदनन् म्हणाल्यावर या अतिलघू चित्रपटाचा ‘अर्थ’ कळतो! त्यांच्या चित्रांचा अर्थ असा सांगून समजण्यातला नाही, किंवा असू नये. लाइट-बल्ब हे प्रतीक किंवा वास्को द गामा, पुस्तक, पुतळे, लेनिन, लाल शर्ट, आग अशी प्रतीकं वापरून ही चित्रं एक गोष्ट सांगताहेत – किंवा ‘मी गोष्ट सांगण्यापेक्षा.. तुमची तुम्ही शोधून काढा’ अशी नम्र विनंती करताहेत. यात ‘बल्ब हे सृजनशक्तीचं, अभिव्यक्तीचं प्रतीक’ असं सांगून चित्राचा प्रत्यय येईलच, असं नाही. वारंवार येणारं ते प्रतीक कशाचं, याचा साक्षात्कार झाला तर मात्र अर्थही आपला आपल्याला सापडला!

चारकोलमधल्या ड्रॉइंग्जच्या मालिकेचं नाव ‘बाबेल’ असं आहे. ‘बाबेल ही एकच भाषा जगात होती आणि एकभाषक समाज असल्यामुळे देवांच्या राज्यावर- स्वर्गावरही विजय मिळवण्याची ऊर्मी या एकसंध मानव-समाजात होती; पण तशा हालचाली होताच स्वर्गातून सूत्रं हलली आणि मानवसमाज निरनिराळ्या भाषांमध्ये विभागला जाऊन, देवांना भारी पडणारा मानवी एकसंधतेचा प्रबळपणाही संपला’- अशी एक दंतकथा बहुतेकांना माहीत असतेच. तिचा या मालिकेशी संबंध इतकाच की ही बहुतेक ड्रॉइंग्ज चित्रपटांशी संबंधित आहेत. चित्रपटांची भाषा ही आजची ‘बाबेल’ आहे. ती मानवसमाजाचं एकसंधीकरण करू शकते.

आपल्याकिनाऱ्यावर..

पुन्हा गेटवेला परतलात की रेडिओ क्लबकडे जायचं. रस्ता संपला की काटकोनात वळून फुटपाथवरनं कुलाबा कॉजवेच्या आधीच, डाव्या बाजूला ‘साक्षी गॅलरी’ लागते. ती दुसऱ्या मजल्यावर आहे. जिने चढावे लागतात. बेल वाजवून आत गेलात की सुमेध राजेन्द्रन यांचं शिल्पप्रदर्शन! ही शिल्पं धातू, लाकूड, संगमरवर आदी वापरून केलेली असली तरी, शिल्पकलेत या साधनांचा जो ‘टिपिकल’ वापर केला जातो- म्हणजे धातू साच्यातून काढणं, लाकडाचे तुकडे जोडून आकृती तरी उभारणं किंवा कोरीवकाम करणं, संगमवरातून खोदून-कोरून शिल्प घडवणं.. तसा सुमेध यांनी केलेला नाही. इथे धातूचं जोडकाम आहे, लाकडातून जणू फर्निचर बनवावं तशा क्रिया वापरून ‘आत दुमडलेले डोंगर’ (उठावाऐवजी खोदाईची निसर्गदृश्यं) यासारखा एखादा अशक्य आकार घडवू पाहणं, अशा प्रकारची ही शिल्पं आहेत. शिल्पकाराला काही ठिकाणी गतीचा, हालचालीचा, अंतराचा, तर ‘दुमडलेल्या डोंगरां’मधून सखोलतेचा अनुभव शोधायचा आहे, एवढं नक्कीच समजेल. राजेन्द्रन यांच्या एकंदर कामात एक करकरीत, शिस्तबद्ध नेमकेपणा असतो. तो इथेही बाकीच्या सर्व शिल्पांमध्ये दिसेलच, पण एक शिल्प याला अपवाद..

या शिल्पाचं नाव आहे ‘ढगांमधून प्रवास’! रेल्वे रूळ दिसताहेत, ते संगमरवरी ठोकळ्याच्या वर ठेवलेत. हे ‘ढगातून प्रवासा’च्या अनुभवाचं दृश्यात केलेलं पृथ:करण आहे. पण हे पृथ:करण केलेलं रूप पुन्हा आपण पाहू तेव्हा काय काय होईल? हिलस्टेशनला ‘टॉय ट्रेन’मधून प्रवास करतानाचा अनुभव आपल्यालाही आठवेल. ते धुकं गोठवायचं, तर संगमरवरच हवा हेही पटेल! आणि हे होत असताना आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या स्मितरेषेचं वळण, जणू छोटुकल्या रेल्वेरुळांच्या त्या नागमोडी वळणांइतकंच लयदार असेल.

साधनांचा विचार सुमेधनं कसा केला, हे समजण्यासाठी दारासमोरचंच हे शिल्प महत्त्वाचं आहे.

जहांगीरमध्ये..

कोल्हापूरचे संजीव संकपाळ, मूळचे त्रिपुराचे पण सध्या दिल्ली-मुंबईत अधिक दिसणारे निताई दास आणि मुंबईवासीच असलेला अखिलेश कुमार यांची चित्रं-शिल्पं ‘जहांगीर’च्या लांबलचक तीन दालनांमध्ये आहेत, तर पॉल अब्राहम यांच्या फोटोग्राफी-आधारित

कलाकृतींचं प्रदर्शन ‘सभागृह दालना’त आहे. यापैकी संकपाळ यांची चित्रं फॉविझम या आधुनिकतावादी तंत्राशी दूरचं नातं सांगणारी, पण इथल्याच रंगांमधली, प्रामुख्यानं ग्रामीण महाराष्ट्रीय विषयांचं दर्शन घडवणारी अशी आहेत. अखिलेश कुमार यांची ड्रॉइंग्ज आणि शिल्पं ही लयदार आणि मुक्तचिंतनात्मक असली, तरी त्यांनी या प्रदर्शनाला खुबीनं ‘सोचालय’ असं नाव दिलं आहे!