संदीप आचार्य लोकसत्ता

मुंबई : मूत्रपिंडाच्या विकारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना त्या तुलनेत पुरेशी डायलिसीस सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांची उपचाराअभावी परवड होत आहे. डायलिसीसचा खर्चही परवडत नसल्यामुळे शासकीय सेवेअंतर्गत डायलिसीस सेवेचा विस्तार होण्याची गरज लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यात नवीन २० डायलिसीस सेंटर सुरू करण्याचा त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या डायलिसीस केंद्रांची क्षमता वाढविण्या निर्णय घेतला आहे.

उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे मूत्रपिंड विकार होऊन रुग्णाला डायलिसीस करण्याशिवाय पर्याय राहात नाही. खासगी रुग्णालयांमध्ये प्रति डायलिसीस १२०० रुपये ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येत असून रुग्णाला आठवडय़ातून किमान तीनवेळा चारतास याप्रमाणे डायलिसीस करावे लागते. डायलिसीससहऔषधोपचाराचा खर्च वेगळा असून रुग्णाला महिन्याकाठी किमान २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. गरिबांनाच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही हा खर्च परवडणारा नसल्यामुळे तसेच अपुऱ्या संख्येने असलेल्या डायलिसीस केंद्रामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत असतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये २० डायलिसीस केंद्र सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे सध्या असलेल्या ३१ केंद्रांची कार्यक्षमता वाढवून बळकटीकरण करण्यात येणार आहे.

जिल्हा व सामान्य रुग्णालयांमधील डायलिसीस केंद्रांमध्ये सध्या दोन पाळ्यांमध्ये डायलिसीस सेवा दिली जाते. आता ही सेवा तीन पाळ्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. २०१६-१७ मध्ये शासकीय सेवत ६४,२८० वेळा डायलिसीस करण्यात आले तर १७-१८ मध्ये ६६,३८४ आणि २०१८-१९ मध्ये ७५ हजार ४९२ वेळा रुग्णांना डायलिसीस सेवा देण्यात आली. तसेच या सर्व केंद्रांवर मूत्रपिंडविकार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सांगितले.

तीन पाळ्यांमध्ये ही केंद्र चालविल्यामुळे आणखी २४ हजार वेळा डायलिसीस करता येणार असून यासाठी १५८ परिचारिका व १७२ तंत्रज्ञांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी साडेसात कोटी रुपये जादा खर्च येणार आहे. याशिवाय २० नवीन डायलिसीस केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. खरेतर मूत्रपिंडाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मोठय़ा प्रमाणात डायलिसीस केंद्र सुरू करणे व असलेल्या केंद्रांचा विस्तार करण्याची गरज आहे तथापि पुरेसे नेफ्रॉलॉजिस्ट व तंत्रज्ञ मिळण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मुंबईत आज शासकीय, पालिका व खासगी मिळून २०० डायलिसीस केंद्र आहेत व तेथे ९८०० रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात १७००० रुग्ण असून एकूण ३७५ केंद्रांच्या माध्यमातून डायलिसीस सेवा त्यांना देण्यात येत आहे. देशाचा विचार केल्यास देशात ४३०० डायलिसीस केंद्र असून ३५ हजाराहून अधिक रुग्णांना डायलिसीस केले जाते. डायलिसीसची गरज असलेल्या  मूत्रिपडरुग्णांच्या संख्येत प्रतिवर्षी २० टक्क्यांनी वाढ होते.

      – डॉ उमेश खन्ना , मूत्रपिंडविकारतज्ज्ञ