मुंबईच्या वेशीवरील सर्व पथकर नाक्यांवर अंमलबजावणी नाहीच

मुंबई : पथकर नाक्यांवरील टोलवसुलीत पारदर्शकता यावी तसेच या ठिकाणी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने बंधनकारक केलेली ‘फास्टॅग’ यंत्रणेची अंमलबजावणी अद्याप मुंबईच्या वेशीवरील तसेच वांद्रे-वरळी सी लिंकवर होऊ शकलेली नाही. ‘फास्टॅग’च्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेली १५ जानेवारीची मुदतही उलटली असून आता ही सुविधा कार्यान्वित होण्यास महिनाअखेर उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘फास्टॅग’ योजनेला गेल्या वर्षभरात सातत्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सर्व पथकर नाक्यांवर १ जानेवारीपूर्वी फास्टॅगची यंत्रणा बसविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधितांना दिले होते. त्यात पुन्हा १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

या सर्व मुदतवाढीनंतरदेखील मुंबईच्या वेशीवर अजूनही फास्टॅग यंत्रणा कार्यरत झालेली नाही. फास्टॅग यंत्रणेची चाचणी सुरू असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘सध्या ऐरोली टोल प्लाझा येथे चाचणी सुरू असून, बुधवारपासून वांद्रे-वरळी सी लिंकवर चाचणी सुरू होईल. इतर नाक्यांवर चाचणी पूर्ण झाल्यावर या महिनाअखेपर्यंत फास्टॅग यंत्रणा सर्वत्र कार्यरत होईल’, असे महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड (लालबहादूर शास्त्री मार्ग), मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या पाच ठिकाणी पथकर नाके आहेत. या सर्व ठिकाणी फास्टॅग यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे-वरळी सी-लिंकच्या पथकर नाक्यावरदेखील फास्टॅग यंत्रणा बसवण्यात येणार आहे. चाचणीसाठी प्रत्येक नाक्यावर किमान दोन-तीन दिवसांचा कालावधी गरजेचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जानेवारी अखेपर्यंत मुंबईच्या वेशीवर सर्वत्र फास्टॅग कार्यरत होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ आणि वाहतूकदारांच्या संघटनांनी मुंबईच्या पथकर नाक्यांवरदेखील फास्टॅग यंत्रणा सुरू करण्याची मागणी महामंडळाकडे केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरात मालवाहतूक करणारी वाहने मुंबईतदेखील येत असतात, त्यांना मुंबईत प्रवेशासाठी फास्टॅग सुविधा सोयीची असल्याने ही मागणी होत असल्याचे अधिकारी म्हणाले.