दोघांचा एकाचवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश

नारायण राणे आणि सिद्धरामय्या हे दोघेही आपापल्या पक्षाच्या नेत्यांच्या मुलांच्या मनमानीला कंटाळून साधारणपणे एकाच वेळी काँग्रेसमध्ये दाखल झाले. उभयतांची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची होती. संयम पाळलेल्या सिद्धरामय्या यांना काँग्रेसने कर्नाटकचे मुख्यमंत्री तर केलेच, पण पुढील वर्षी होणारी निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्याचे जाहीरही केले. याउलट आक्रमक स्वभाव आणि वेळोवेळी नेत्यांवरच तोफ डागल्याने राणे यांना काँग्रेसने बेदखल केले. त्यातून राणे यांच्यावर काँग्रेसला रामराम ठोकण्याची वेळ आली.

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे महत्त्व वाढले आणि राणे बाजूला फेकले गेले. मग राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. यातूनच राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने शब्द पाळला नाही, असे राणे वारंवार सांगतात. त्यांची महत्त्वाकांक्षा अर्थातच मुख्यमंत्रीपदाची होती. विलासराव देशमुख यांच्यानंतर अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन चव्हाणांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर संधी दिली, पण राणे यांच्या नावाचा विचार झाला नाही. शेजारच्या कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी हे राजकारणात सक्रिय झाल्याने जनता दल (सेक्यूलर)मध्ये सिद्धरामय्या यांचे खच्चीकरण करण्यात आले. सिद्धरामय्या यांनी काँग्रेसची वाट धरली. राणे आणि सिद्धरामय्या या दोघांचे लक्ष्य एकच होते व ते म्हणजे मुख्यमंत्रीपद.

२०१३ मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर सर्व प्रस्थापित नेत्यांना दूर ठेवून काँग्रेसने बाहेरून आलेल्या सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावर संधी दिली. तसेच पुढील वर्षी होणारी विधानसभेची निवडणूक सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, असे जाहीर केले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर सिद्धरामय्या यांनी संयम बाळगला. सर्व नेत्यांशी जुळवून घेतले. त्याचे त्यांना फळ मिळाले.

काँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासून नारायण राणे यांनी शिवसेना पद्धतीने राजकारण केले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. राणे हे मुख्यमंत्रीपदाशिवाय राहूच शकत नाही, असे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे ठाम मत झाले. त्यांच्याबद्दल संशय कायम राहिला. त्यातच गोरेगावमध्ये पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेत झालेल्या गोंधळाचे सारे खापर राणे यांच्यावर फुटले होते. मुख्यमंत्रीपद नाकारल्यावर राहुल गांधी आणि अहमद पटेल या दोन नेत्यांवर राणे यांनी केलेली टीकाटिप्पणी त्यातून राणे पक्षाच्या नेतृत्वाच्या मनातून उतरले.

मुख्यमंत्रीपदी राणे यांच्या नावाचा पक्षाने विचार केला नाही. तसेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचे टाळण्यात आले. लागोपाठ दोन पराभवांनंतर काँग्रेसने राणे यांना विधान परिषदेची आमदारकी मात्र दिली. राणे यांच्याबद्दल नेतृत्वाच्या मनात विश्वासाची भावना नसल्यानेच त्यांच्या नावाचा कोणत्याही महत्त्वाच्या पदासाठी विचार झाला नाही, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जाते.