कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे असं आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. महसुली  नोंदीनुसार ही जागा राज्य सरकारची आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मेट्रोची जागा आरे कारशेडवरुन कांजूरमार्ग या ठिकाणी हलवण्यात आली. त्यानंतर भाजपाने शिवसेनेवर आणि खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली होती. आता कांजूरच्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. त्यामुळे कांजूरच्या जागेवर मेट्रो कारशेड होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे. अशात आता ही जागा राज्य सरकारचीच आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?
आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

दरम्यान कांजूरच्या जागेवर केंद्राने दावा सांगताच महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपाला मुंबईच्या विकासाच्या आड यायचं आहे आणि हा प्रकल्प रखडवायचा आहे असाही आरोप करण्यात आला. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार हळूहळू आणीबाणीच्या दिशेने देशाला नेत असल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे नेतेही शांत बसले नाहीत, त्यामुळे आज दिवशभर मेट्रो कारशेड प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहण्यास मिळाल्या. दरम्यान आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेडची कांजूरची जागा ही राज्य सरकारचीच असल्याचं म्हटलं आहे.