आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील नेत्यांकडून भाजपावर निशाणा साधला जात आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील याच मुद्यावरून भाजपावर टीका केली आहे.

”भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा. मविआ सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयांत भाजपा व मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करते. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जमीन ही राज्याची आहे.” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कटकारस्थान; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

तसेच, ”१९८१ अगोदर पासून महाराष्ट्र शासन नाव लागलेले आहे. २०१५ साली विभागिय आयुक्तांनी सॉल्ट डिपार्टमेंटला ही जमीन दिली गेल्याचे कोणतेही पुरावे देता आले नाहीत, यामुळे त्यांचा दावा निकालात काढला होता. तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. असं असताना ३ वर्षे या निर्णयाला सॉल्ट डिपार्टमेंटने न्यायालयात आव्हान दिले नाही. पण तीन वर्षांनंतर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर मात्र लगेच त्यांना आठवण झाली. हा योगायोग नाही. महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे. जाहीर निषेध!” असं देखील सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे- सुप्रिया सुळे

या अगोदर  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या मुद्यावरून भाजपावर टीका केली आहे. कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहे. असा आरोप मलिक यांनी केलेला आहे.