मुंबई : काही दिवसांपूर्वी पवईच्या एनआयटीआयई संस्थेच्या आवारात आपल्या बछड्यांसह वास्तव्यास आलेल्या मादी बिबट्याने तेथून आपला मुक्काम हलवला आहे. ५ ते ६ दिवस मुक्काम करून दोनच दिवसांपूर्वी मादी बिबट्याने बछड्यासह आपली तात्पुरत्या वास्तव्याची जागा सोडली.

आरे परिसरातील विहार तलावापासून जवळच असणाऱ्या एनआयटीआयई संस्थेच्या आवारात मादी बिबट्या तिच्या एका बछड्यासह दिसली होती. या भागात बिबट्याचा बछडा दिसण्याची पहिलीच वेळ असल्याने स्थानिकांमध्ये त्याच्याबद्दल कुतूहल होते. त्यानंतर बिबट्याने आपल्या दुसऱ्या बछड्यालाही तेथे आणले. तिघांच्या दैनंदिन जीवनात कोणताही हस्तक्षेप न करता वन विभागाचे कर्मचारी त्यांच्या संरक्षणासाठी संबंधित ठिकाणी थांबले होते. तेथे काही कॅ मेरेही बसविण्यात आले होते.

साधारण ५ ते ६ दिवस मुक्काम करून मादी बिबट्याने तिच्या एक ते दीड महिन्यांच्या दोन्ही बछड्यांसह आपली तात्पुरत्या वास्तव्याची जागा सोडली आणि ती जंगलाच्या मुख्य भागात निघून गेली आहे.