मासिक पासधारकांना मेल-एक्स्प्रेसमधून प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता
उपनगरीय रेल्वेगाडय़ांतील वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या मध्य रेल्वेने आता आणखी एक धाडसी आणि तरीही सोपा उपाय योजण्याचे ठरवले आहे. कल्याण, ठाणे आदी स्थानकांतून प्रवास करणाऱ्या पासधारक प्रवाशांना लांबपल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करण्याची परवानगी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास उपनगरीय रेल्वेमार्गावरील गर्दीवर मोठा तोडगा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई ते कल्याण या उपनगरीय रेल्वेमार्गावर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत एका उपनगरीय रेल्वे गाडीतून तब्बल पाच हजार प्रवासी प्रवास करतात. अनेकदा गाडीच्या दरवाजांना लटकलेल्या या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असूनही अपुऱ्या गाडय़ांची संख्या, नव्या सेवा चालवण्यासाठी उपलब्ध नसलेला मार्ग आदी गोष्टींमुळे रेल्वे प्रशासन हतबल झाले आहे. ‘भावेश नकाते’ प्रकरणानंतर रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या आढावा समितीच्या दुसऱ्या बैठकीत याबाबत विविध उपाय सुचवण्यात आले.
या उपायांमध्ये लांबपल्ल्याच्या गाडय़ांतून उपनगरीय पासधारक प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा प्रस्तावही आहे. सकाळच्या वेळी मुंबईकडे येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा बहुतांश वेळा कल्याण-ठाणे या स्थानकांवर रिकाम्या होतात. तसेच संध्याकाळीही या गाडय़ांमध्ये ठाणे किंवा कल्याण येथे जास्तीत जास्त प्रवासी चढतात.
मध्य रेल्वेची दर दिवशीची उपनगरीय प्रवासी संख्या ३० ते ४० लाखांच्या दरम्यान आहे. त्यापैकी २८ लाख प्रवासी पासधारक असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात येते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे आणि कल्याण येथील बहुसंख्य पासधारक या गाडय़ांकडे वळतील. परिणामी उपनगरीय गाडय़ांमधील गर्दी कमी होण्याची शक्यता मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने वर्तविली.