20 February 2019

News Flash

‘सीबीएसई’च्या ७५ शाळांमध्ये वित्तीय बाजारपेठ व्यवस्थापन

राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) यांच्या मदतीने हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’च्या (सीबीएसई) आणखी ७५ शाळांनी वित्तीय बाजारपेठ व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) यांच्या मदतीने हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एकाही शाळेने यंदा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात स्वारस्य दाखविलेले नाही, हे विशेष. गेल्या वर्षी काही शाळांमध्ये ऐच्छिक कार्यानुभव (व्होकेशनल) म्हणून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाचा भर आर्थिक व्यवस्थापन आणि वित्तीय नियोजन यावर आहे. यंदा दिल्ली, आग्रा, जयपूर आणि डेहराडून येथील २५ शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. तसेच, पंजाबमधील प्रतिष्ठित भारती फाऊंडेशनच्या पाच नामांकित शाळा, वाराणसीतील बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या अखत्यारितील शाळा आणि दिल्ली पब्लिकस्कूलच्या शाळांमध्येही यंदापासून या विषयाचा पर्याय विद्यार्थ्यांना स्वीकारता येईल. दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, कोलकाता, ओरिसा, केरळ, अंदमान निकोबार बेटे या अभ्यासक्रमाकरिता एएसईच्या वतीने शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या टप्प्यात १५० शिक्षक यासाठी प्रशिक्षण घेणार आहेत. या २०० तासांच्या शिक्षण सत्रात क्रमिक अभ्यासक्रम आणि कार्यानुभव यांचा समावेश आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना ‘आर्थिक व्यवस्थापनाची मुलभूत तत्त्वे’ आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘वित्तीय बाजारपेठे’ची ओळख हे विषय शिकविले जाणार आहेत.

First Published on April 27, 2016 3:35 am

Web Title: the management of financial market introduce in cbse school