वेधशाळेने यंदाच्या मान्सूनचा अंदाज परवाच जाहीर केला आणि यावेळी कोणीही त्या अंदाजावर हसले नाही.. पाऊस यावा आणि भरपूर यावा अशीच सर्वाची इच्छा आहे. त्यामुळे पावसाचे आशादायी चित्रही अनेकांना सुखावून गेले. एरवी भारतीय हवामान खात्याचा अंदाज चेष्टेचा विषय ठरतो. पण गेल्यावर्षी खासगी संस्था तसेच इतर काही देशांच्या वेधशाळा चांगल्या मान्सूनचे अंदाज वर्तवत असताना भारतीय वेधशाळा मात्र दुष्काळाच्या अंदाजावर ठाम राहिली होती, त्यावेळी अनेकांनी नेहमीप्रमाणे वेधशाळेची खिल्ली उडवण्याची संधीही साधली होती. मात्र तो अंदाज अगदी योग्य ठरला.
कशावर काढले गेले होते हे अंदाज?.. एल निनोमुळे मान्सून अडतो हे तर आता लहान मुलांनाही माहिती झाले आहे. एल निनो म्हणजे मध्य व पूर्व-मध्य प्रशांत महासागरामधील विषुववृत्ताजवळ पृष्ठभागाच्या पाण्याचे वाढलेले तापमान. यामुळे अमेरिका, कॅनडा अशा देशांवर परिणाम होतोच पण इथे आपल्याही तोंडचे पाणी पळते. अनेक वर्षे या एल निनो फॅक्टर आणि मान्सूनच्या प्रभावाबाबत शंका होती. पण आता हा प्रभाव निशंकपणे मान्य झाला आहे. अर्थात एल निनो हा मान्सूनचे भवितव्य ठरवणारा काही एकमेव घटक नाही. भारतीय मान्सून अत्यंत लहरी असतो आणि त्याचा अंदाज वर्तवण्यासाठी शेकडो, हजारो बाबींवर अवलंबून राहावे लागते. एल निनो त्यापैकी एक. इतर घटकांमध्येही महासागराच्या पृष्ठभागांवरचे तापमान आणि दोन सागरांच्या पृष्ठभागांमधील तापमानातील फरक महत्त्वाचा ठरतो. याचे एक अगदी सामान्य भाषेत सांगता येणारे कारण म्हणजे जिथे हवा तापलेली असते तिथे वारा वळतो. मान्सूनचे वारेही त्याला अपवाद नाहीत. या वाऱ्यांना भारतापर्यंतचा प्रवास करण्यासाठी पृथ्वीच्या परिवलनासोबतच हे तापमानातील फरकही मदत करतात. त्यामुळेच अटलांटिक आणि उत्तर प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानातील फरक, हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे विषुववृत्ताजवळील तापमान, पूर्व आशियातील समुद्रावरील हवेचा दाब महत्त्वाचा असतो. याशिवाय वायव्य युरोपातील जमिनीच्या पृष्ठभागालगतचे तापमानही पाहिले जाते. हे कदाचित वाचताना तांत्रिक वाटत असेल पण प्रत्यक्षात हे त्यापेक्षाची किचकट आहे. आणि हे फक्त प्रमुख दुवे. या सर्वाचा एकमेकांशी संबंध लावताना अनेक सूक्ष्म दुवे जुळवून पाहावे लागतात.
आता हेच पाहा ना, एल निनो आहे म्हणजेच प्रशांत महासागरातील पाणी सरासरीपेक्षा अधिक तापले आहे, हे गेल्यावर्षी सर्वच वेधशाळांना माहिती होते. मात्र त्याचा मान्सूनवर परिणाम होईल का, ते निश्चित सांगण्यासाठी या पाण्याचे तापमान नेमके कधी कमी होऊ लागेल, या पाण्याचे वस्तुमान म्हणजे प्रमाण किती आहे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे.. हो आणि आणखी एक घटक म्हणजे आयओडी. इंडियन ओशियन डायपोल. थोडक्यात सांगायचे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागाचे तापमान आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान यातील फरक. या दोन्हीच्या तापमानात कोणताही फरक नसेल तर त्याला झीरो आयओडी म्हटले जाते. अरबी समुद्राचे तापमान अधिक असले तर तो पॉझिटिव्ह आयओडी ठरतो. मान्सूनचे वारे अरबी समुद्राकडे खेचण्यासाठी साहजिकच तापमानातील हा फरक मोलाचा असतो. आता हे सर्व सोपस्कार करून मान्सूनचे वारे केरळमध्ये पोहोचले तरी कमी दाबाचे क्षेत्र, डोंगरांमुळे पर्जन्यछायेत आलेला प्रदेश, हवेचा दाब, बाष्पाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, दिशा असे पुन्हा शेकडो स्थानिक घटक असतात. तर असे शेकडो गुणिले शेकडो बाबी लक्षात घ्याव्या लागतात. यासाठी गेल्या शंभरहून अधिक वर्षांत वेधशाळेने केलेला मान्सूनचा अभ्यासही कामी येतो. आणि हे सर्व करून अंदाज लावला जातो. कधी? तर मान्सून येण्यापूर्वी तब्बल दोन महिने आधी. जगाच्या एका कोपऱ्यात फुलपाखराने पंख फडफडवले तर दुसऱ्या भागात वादळ येऊ शकते, असा सिद्धांत एडवर्ड लॉरेन्स यांनी मांडला होता. त्यावरून या सर्व गुंतागुंतीचे विश्लेषण करणे किती संभाव्यता घेऊन येते ते लक्षात घेण्यासारखे आहे.
या पावसाचा शेतकऱ्यांना, नोकरदारांना, व्यापाऱ्यांना किती उपयोग होतो, असा एक वाद आहे. तो काही अंशी खराही आहे. सकाळी वांद्रय़ाला किंवा कुल्र्याला पाणी साचून लोकल बंद पडण्याइतपत पाऊस पडणार का.. या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे हे खरेच. पण अनेकदा पाणी साचण्याचा संबंध हा भरपूर पावसाशी संबंधित असेलच असे नाही. आणि असे स्थानिक पातळीवरचा अंदाज वर्तवण्यासाठी हवामान केंद्राचे मोठे जाळे उभारण्याची व त्यातून येणाऱ्या नोंदींचे बारकाईने विश्लेषण करण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत वेधशाळा त्यादृष्टीनेही प्रयत्न करतेय. उच्च तंत्रज्ञान वापरल्यामुळे गेल्या दहा वर्षांत सहा वेळा वेधशाळेचे एकूण पावसाचे अंदाज योग्य ठरले आहेत. जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) ६० टक्के अंदाज अचूक ठरण्याचा निकष मांडला आहे. भारतीय वेधशाळेने आता ७० टक्के अचूक अंदाजाचे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक हवामान बदल होताना मान्सूनही झपाटय़ाने बदलतोय आणि त्यामुळे त्याचा अंदाज वर्तवणे हे अधिक जिकरीचे होत जाणार आहे, या पाश्र्वभूमीवर ७० टक्के अचूक अंदाज हे मोठे आव्हानच आहे. आणखी एक.. वेधशाळा अंदाज वर्तवते तेव्हा तो चुकला तर त्याची जबाबदारीही घेते आणि टीकाही सहन करते. गेल्यावर्षी खासगी संस्थेने मांडलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजावरून वेधशाळेवर टीका करण्यात आली. तो अंदाज सपशेल चुकला. पण त्यावर टीकेचा सूर उमटला नाही.
प्राजक्ता कासले – prajakta.kasale@expressindia.com