अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. सरकारला जागं करणाऱ्या या शेतकरी वादळामागे तीन प्रमुख नेत्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना संघटित करून त्यांचा शांततापूर्ण मोर्चा मुंबईत आणण्यामागे या त्रिकूटाने मोलाची कामगिरी केली. जाणून घेऊयात हे तीन जण नेमके आहेत तरी कोण…

जीवा पांडू गावित (जेपी गावित)

 

नाशिकच्या कळवण येथे सात वेळा निवडून आलेले आमदार जीवा पांडू गावित भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) नेते आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील विधानसभेत डाव्या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव नाव म्हणून आमदार गावित यांच्याकडे पाहिले जाते. साधं राहणीमान असणारे गावित हे या शेतकरी मोर्चामागील मुख्य सूत्रधार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारो आदिवासींना संघटित करण्यामागे त्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे.

अशोक ढवळे

डॉ. अशोक ढवळ हे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. १९९३ सालापासून गोदावरी परुळेकर यांच्या प्रेरणेतून डॉ. ढवळे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यात किसान सभेचे काम करण्यास सुरुवात केली. कर्जमुक्ती, रास्त भाव, स्वामिनाथन आयोग, वनाधिकार, दुष्काळ, पीक विमा, सिंचन, वीज, अन्याय्य भूमी अधिग्रहण, महामुंबई एसईझेड, बुलेट ट्रेन अशा प्रश्नांवर ढवळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य किसान सभेने जोरदार स्वतंत्र आणि संयुक्त लढे दिले आहेत.

अजित नवले

जून २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनामागे महत्त्वाची भूमिका बजावणारे अजित नवले अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव आहेत. २०१७ मधील या आंदोलनाने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यास भाग पाडले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासोबतच संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दिडपट हमीभाव मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. शहरी भागात होणाऱ्या भाज्या आणि फळांचा पुरवठा आम्ही बंद करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. बऱ्याच चर्चांनंतर सरकारने सुकाणू समितीची स्थापना करत नवले यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र सरकारी योजनांच्या आराखड्यांनी समाधानी नसल्याने नवले हे तेव्हापासून जिल्हा आणि तालुका पातळीवरील शेतकरी आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.