News Flash

‘मोल्ट-फ्लिपर’चे बागडणे पुन्हा सुरू

वेगवेगळे उपक्रम आणि खेळांच्या माध्यमातून या दोघांना पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यात पशुवैद्यकांना यश आले आहे.

‘मोल्ट-फ्लिपर’चे बागडणे पुन्हा सुरू
(संग्रहित छायाचित्र)

विणीचा हंगाम सुरू होणार असल्याने दोन जोडय़ांकडून गोड बातमीची अपेक्षा

गेल्या आठवडय़ात आपल्या गोंडस पिल्लाला गमावल्यामुळे काही दिवस अस्वस्थ असलेली मोल्ट-फ्लिपर ही पेंग्विन पक्ष्याची जोडी आता पेंग्विन कक्षात पुन्हा एकदा रुळली आहे. वेगवेगळे उपक्रम आणि खेळांच्या माध्यमातून या दोघांना पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यात पशुवैद्यकांना यश आले आहे. तर मादी फ्लिपरमध्ये यापूर्वी कधीही न दिसलेल्या सकारात्मक बदलांचे निरीक्षण पशुवैद्यकांनी नोंदविले आहे. प्रजननाचा दुसरा कालावधी लवकरच सुरू होणार असल्याने उरलेल्या दोन जोडय़ांकडून गोड  बातमी मिळण्याची शक्यता पशुवैद्यकांनी व्यक्त केली आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये (राणीची बाग) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जन्मास आलेले पहिले भारतीय पेंग्विनचे पिल्लू २२ ऑगस्टच्या रात्री दगावले. शरीराच्या विकासात्मक वाढीत आवश्यक असणारे शारीरिक बदल निश्चित वेळेत न झाल्याने पिल्लाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. पिल्लाच्या मृत्यूनंतर मात्र मोल्ट-फ्लिपर या त्याच्या जन्मदात्यांना धक्का बसला होता. मात्र त्यांना इतर पेंग्विनच्या बरोबरीने निरनिराळ्या उपक्रमात आणि खेळांमध्ये पशुवैद्यकांनी सहभागी करून घेतले आहे.

जुलै महिन्यापासून मोल्ट-फ्लिपर अंडे उबविण्यात आणि त्यानंतर पिल्लाची देखभाल करण्यात व्यस्त होते. त्यामुळे दोघेही खेळांपासून लांब होते. लेझर किरण आणि आरशाद्वारे प्रकाशाचे कवडसे पाडून मोल्ट-फ्लिपरला खेळवत असल्याची माहिती पेंग्विनच्या पशुवैद्यक डॉ. मधुमिता काळे यांनी दिली. या दोघांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

इतर जोडय़ांकडून गोडी बातमी?

राणीबागेतील पेंग्विन कक्षात मोल्ट-फ्लिपर, डोनल्ड-डेझी, पॉपाय- ऑलिव्ह अशा जोडय़ा असून बबल ही मादी एकटीच आहे. मार्च ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा पेंग्विनचा विणीचा काळ आहे. मोल्ट-फ्लिपर वगळून इतर दोन जोडय़ांमध्ये प्रजननाचे संकेत असल्याची माहिती डॉ. मधुमिता काळे यांनी दिली. दोन्ही जोडय़ांनी कक्षामध्ये घरटे बांधण्यासाठी जागेची निवड केल्याने प्रजननाचे संकेत दिसत आहेत. मात्र घरटे बांधण्याचे काम नर करतात. परंतु डोनल्ड आणि पॉपाय हे दोन्ही नर घरटे बांधण्याचे संकेत देत नसल्याचे काळे यांनी सांगितले. मात्र ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा विणीचा काळ येणार असल्याने या दोन्ही जोडय़ांकडून आम्हाला गोड बातमीची आशा असल्याचे, काळे म्हणाल्या. तर यंदा तसे न घडल्यास पुढल्या वर्षी तिन्ही जोडय़ा पिल्लाला जन्म देण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्लिपरमध्ये बरेच सकारात्मक बदल जाणवत आहेत. कक्षामध्ये खेळण्यासाठी घसरगुंडी बसविल्यापासून फ्लिपर कधीही घसरगुंडीवर खेळली नव्हती. मात्र आता ती नियमित घसरगुंडीवर खेळत असल्याने हा बदल चांगले परिणाम दर्शवीत आहे. तसेच त्यांचा आहारही पूर्ववत झाला आहे.

– डॉ. मधुमिता काळे, पशुवैद्यक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 4:31 am

Web Title: the molt flippers replay started again
Next Stories
1 शहरात उंच इमारतींत आगीच्या दीड हजार घटना
2 मुंबईची कूळकथा : दहाव्या शतकातील समृद्ध मुंबई!
3 घरनिर्मिती मंदावणार?