करोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. त्यानंतर राज्य शासनाने परीक्षा ९ एप्रिल रोजी पुढे ढकलली होती. दरम्यान, ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात एक परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील, असे परिपत्रकात म्हटले आहे

 

राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची चातकासारखी वाट बघत होते. एमपीएससीने  संयुक्त परीक्षेसाठी आपत्ती व पुनर्वसन विभागाकडे ‘नाहरकत प्रमाणपत्र’साठी पत्रव्यवहार केला होता. दरम्यान, यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या ३ ऑगस्ट २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा ४ सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात येईल.