मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून पाणी आणि हवेतून होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी ठप्प झाली असून मनुष्यबळ आणि अद्ययावत उपकरणांअभावी पालिकेचा पर्यावरण विभाग विकलांग झाला आहे. पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याने शिवसेना नगरसेविकेला या विषयाला स्थायी समितीच्या बैठकीत वाचा फोडावी लागली.
मुंबईमधील प्रदूषणाची दखल घेण्यासाठी महापालिकेने पर्यावरण विभाग सुरू केला. मुंबईच्या पावलावर पाऊल टाकून ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांनी पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली. पण मुंबई महापालिकेतील पर्यावरण विभागाला आजही स्वतंत्र अस्तित्वच नाही.
 कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्याची तपासणी कर्मचाऱ्यांअभावी केली जात नाही. पूर्वी मुंबईतील कारखान्यांना पालिका अधिकारी अचानक भेटी देत होते. परंतु त्याही आता बंद झाल्या आहेत. पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये केवळ एकच साहाय्यक अभियंता आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सोडलेले पाणी, कारखान्यांच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुराची सध्या तपासणीच होत नाही, असा आरोप माजी महापौर शुभा राऊळ यांनी केला आहे. समुद्रकिनारा आणि खाडीकिनाऱ्यालगतच्या खारफुटीची मोठय़ा प्रमाणावर कत्तल होत आहे. तसेच समुद्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने प्रयोगशाळा स्थापन करावी, अशी मागणी शुभा राऊळ यांनी यावेळी केली. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठविले आहे. परंतु त्याची दखलच घेण्यात न आल्यामुळे या प्रश्नाला त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत वाचा फोडली. या संदर्भात प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश देत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनीही या मुद्याचे घोंगडे भिजत ठेवले.
या विभागात अनेक पदे रिक्त आहेत. क्षेपणभूमीत मिथेन वायू आणि व्होलॅटाइल ऑर्गेनिक यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. पण तेथील उपकरणे बंद असल्यामुळे तपासणी होतच नाही.