देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह’च्या निमित्ताने बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान आबालवृद्धांकरिता पूर्णवेळ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने शहरवासियांना निसर्गाच्या विविध पैलूंची ओळख करून देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन उद्यानाच्या वतीने आठवडाभर केले जाते. यंदाही २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान या उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हे कार्यक्रम दिवसभर उद्यानाच्या विविध भागात आयोजिण्यात आले आहेत.
२ ऑक्टोबरचा दिवस ज्येष्ठ नागरिकांकरिता राखीव असेल. या दिवशी  सकाळी ८ ते१०.३० दरम्यान उद्यानाची माहिती, तुलसी प्रवेशद्वारापर्यंत भ्रमंती असा कार्यक्रम असेल. ३ ऑक्टोबरला कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींना कान्हेरी गुंफेची माहिती देण्याकरिता भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ११ असा हा उपक्रम चालेल. तसेच उद्यान स्वच्छता हा कार्यक्रम राबविला जाईल. या करिता १७५ रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.
रविवारी ४ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी १२.३०पर्यंत किचन गार्डनिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम कुटुंबांकरिता असेल. त्यासाठी २०० रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. यात आनंद पेंढारकर स्लाईड शोच्या मदतीने किचन गार्डनिंगची माहिती देतील. तसेच, हे गार्डनिंग कसे करावे या विषयीची माहिती देतील. ५ ऑक्टोबरला शालेय विद्यार्थ्यांकरिता निसर्ग भ्रमणसह ट्रेझर हंट सारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० दरम्यान चालेल. ६ ऑक्टोबरला पत्रकारांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात उद्यानाची माहिती देण्याबरोबर भविष्यात केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती माहिती दिली जाईल. ‘शहरातील वन्यजीवन’ या विषयावर प्रा. प्रवीश पंडय़ा हे पत्रकारांशी संवाद साधतील. तसेच, ‘मानव आणि बिबटय़ांमधील संघर्ष’ या विषयावर उद्यान अधिकारी सस्ते बोलतील. ७ ऑक्टोबरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १५० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. हौशी छायाचित्रकारांना यात सहभागी होता येईल. तसेच शेवटच्या दिवशी म्हणजे ८ ऑक्टोबरला विशेष मुलांसाठी ८.३० ते १०.०० दरम्यान शिलोंडा भ्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बक्षीस समारंभ पार पडेल.