मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे.

स्कायमेटच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती गेल्या काही काळापासून कायम आहे. याचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पूरस्थितीही निर्माण होऊ शकते. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगाणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामानाच्या या परिस्थितीमुळे येत्या तीन दिवसांत मध्य प्रदेश, तेलंगाणा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा स्कायमेटच्या हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील ही परिस्थिती बंगालच्या उपसागरातही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात पाऊस कमी होईल मात्र, तेलंगाणा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कायम राहिल. पुढील तीन दिवसांनंतर आठवड्याच्या शेवटी पश्चिम किनाऱ्यावर विशेषतः मुंबई, कोकण, गोवा आणि कर्नाटकाच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, या आठवड्यात सातारा, कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये साधारण ते मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.