राज्याच्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोमवारी घाऊक बाजारातील कांद्याच्या दराने शंभरी गाठली. परिणामी, किरकोळ बाजारात कांद्याची विक्री उच्चांकी १२० ते १२९ रुपये दराने केली जात आहे. कांदा दरवाढीमुळे गृहिणींचे अंदाजपत्रक पुरते कोलमडले असून कांद्याने डोळ्यांत पाणी आणले आहे.

याआधी २०१३ मध्ये कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचले होते, मात्र यंदा कांद्याने ऐतिहासिक उच्चांक गाठल्याचे नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न समितीतील घाऊ क व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले.

साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात नवीन कांद्याची आवक सुरू होते. मात्र, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत राज्यात पाऊस सुरू होता. कांदा उत्पादक भागाला पावसाने झोडपून काढल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले. शेतात कांदा भिजल्याने तो फेकून देण्याची वेळ आली. अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे पीक हाती येण्यापूर्वीच शेतात खराब झाले. जवळपास ९० ते ९५ टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले, असे सांगण्यात येते.

नवीन कांद्याची आवक लोणंद, फलटण भागांतून होते. नाशिक, पुणे जिल्ह्य़ातील खेड, मंचर, आंबेगाव भागांतून जुन्या कांद्याची आवक होते. जुन्या कांद्याची आवक कमी होत असून गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याची माहिती पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा-बटाटा व्यापारी  राजेंद्र कोरपे यांनी दिली. येथील घाऊक बाजारात रविवारी कांद्याच्या ७० ते ८० गाडय़ांची आवक झाली. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ९०० ते ९५० रुपये असा भाव मिळाला, तर क्विंटलला ८ ते १० हजार रुपये असा उच्चांकी भाव मिळाला, असे कोरपे यांनी सांगितले.

कर्नाटकातून अपुरी आवक

नवीन कांद्याचे पीक हाती येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात नवीन कांद्याची तुरळक आवक सुरू होईल. त्यानंतर कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात कांद्याची मोठी लागवड केली जाते. तेथील नवीन कांद्याला स्थानिक बाजारपेठेतून मोठी मागणी आहे. त्यामुळे कर्नाटकातील कांदा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणणे तसे परवडणारे नाही. दोन वर्षांपूर्वी डिसेंबर २०१७ आणि जानेवारी २०१८ मध्ये कांद्याला उच्चांकी म्हणजे ६५ ते ७० रुपये किलो असा भाव मिळाला होता. अवेळी झालेल्या पावसामुळे कांदा खराब झाला असून बाजारात तुटवडा जाणवत आहे. चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याला किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये असा भाव मिळाला आहे, असे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

दरवाढीचा प्रवास

गणेशोत्सवापूर्वी मुंबईत घाऊ बाजारात कांद्याचा दर २२ ते २५ आणि किरकोळ बाजारात ३० ते ३५ रुपये होता. मात्र पावसामुळे बाजारातील ओल्या कांद्याचे प्रमाण वाढले आणि आवकही कमी झाली होती. त्यामुळे  घाऊ क बाजारात कांद्याच्या दर सतत चढत होते. गणेशोत्सवानंतर घाऊ क बाजारात कांदा पन्नाशीकडे झेपावला. त्यानंतर नवरात्रोउत्सव, दिवाळीत कांद्याला मागणी कमी होती. परिणामी दरात घसरण झाली. पंरतु दिवाळीत पडलेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजारात कांद्याची आवक घटली आणि पुन्हा कांद्याचे दर वधारू लागले. गेल्या दोन आठवडय़ांपासून कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. ४५ ते ५० रुपये असलेला कांदा दोन आठवडय़ांत ६० ते ७० आणि ७० ते ८०वर पोहोचला. आता तर कांद्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. घाऊ क बाजारात सोमवारी कांद्याच्या १२५ गाडय़ा दाखल झाल्या होत्या. त्यात जुन्या कांद्याच्या ६० ते ७० गाडय़ा आहेत.

साठेबाजांचे फावले

पावसाचा मुक्काम वाढल्याने कांद्याचे दर चढू लागले होते. त्यात अवकाळी पावसाने कांद्याचे पीक उद्ध्वस्त केले. अशा परिस्थितीत कांद्याच्या बडय़ा व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी केली. हा साठेबाजीचा कांदा आता चढय़ा दराने विक्रीस काढला जात असल्याचे सांगण्यात येते.

उपाहारगृहातून  कांदा गायब

उपाहारगृह तसेच खाणावळीत कांदा मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. मिसळ मिळणाऱ्या पुण्यातील अनेक हॉटेलमध्ये जादा कांदा हवा असल्यास ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेण्यास सुरुवात झाली आहे. शहरात मोठय़ा संख्येने विद्यार्थी वास्तव्यास आहेत. ते खाणावळीत जेवतात. खाणावळ चालकांकडून कांदा बेताने वापरला जात आहे.

मुंबईतील किरकोळ भाव

जुना कांदा – ११० ते १२९ रुपये

नवीन कांदा-  ७० ते ९० रुपये

पुण्यातील किरकोळ भाव

जुना कांदा- ११० ते १२० रुपये

नवीन कांदा- ७० ते ९० रुपये