शैलजा तिवले

४५ वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणालाही अत्यल्प प्रतिसाद

मुंबई : ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी दुसऱ्या आणि ज्येष्ठांसाठी दोन्ही मात्रांचे पूर्वनोंदणीशिवाय थेट लसीकरण खुले केले तरी सोमवारी पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक केंद्रांवर १०० लशींचे लक्ष्यही पूर्ण झालेले नाही. एकीकडे लसीकरण जलद गतीने पूर्ण करण्याचे लक्ष्य असताना मात्र अशा रीतीने पालिकेचे मनुष्यबळ आणि वेळ या दोन्हीचा अपव्यय होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवडय़ात तीन दिवस ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच पूर्वनोंदणीशिवाय लसीकरण सुरू असल्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला असून हे प्रमाण थेट निम्म्यावर घसरले आहे. तेव्हा ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिली मात्रा पूर्वनोंदणीशिवाय देण्यास मुभा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

झाले काय?

केंद्रावर होणारी गर्दी, लशीचा अनियमित पुरवठा याचा समन्वय साधण्यासाठी पालिकेने प्रत्येक केंद्राचा साठा निश्चित केला असून छोटय़ा केंद्रांना १०० मात्रा दिल्या जात आहेत. तसेच सोमवार ते बुधवार पूर्वनोंदणीशिवाय आणि गुरुवार ते शनिवार नोंदणी आणि वेळ आरक्षित केलेल्यांचे लसीकरण असे वेळापत्रकही पालिकेने तयार केले आहे. त्यानुसार गेल्या आठवडय़ात केवळ ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच पहिल्या मात्रेचे पूर्वनोंदणीशिवाय लसीकरण सुरू केले होते. परंतु याला विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच ऑनलाइन नोंदणी करून वेळ आरक्षित करणेही अनेकांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या आठवडय़ात दिवसाला १५ हजार जणांचे लसीकरण होऊ शकले, तर त्याच्या आधीच्या आठवडय़ात मुंबईतील लसीकरणाची संख्या २५ ते ३० हजारांदरम्यान होती.

प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि काही जणांचे ८४ दिवस पूर्ण होत असल्याने पालिकेने सोमवारपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या मात्रेचे पूर्वनोंदणीशिवाय लसीकरण खुले केले. परंतु यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ‘आमच्याकडे तर दुपापर्यंत केवळ दोन जणांनाच कोविशिल्डची दुसरी मात्रा दिली गेली. ज्येष्ठ नागरिकांची संख्या फारशीही नाही. त्यामुळे केंद्रावर अजिबात गर्दी नव्हती’, असे बीकेसी लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्याने सांगितले. ‘कोविशिल्डची पहिली मात्रा

घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या या आठवडाभरात वाढेल. परंतु अजून तरी फारसे असे नागरिक आलेले नाहीत. त्यामुळे केंद्रावरील १०० मात्राही संपलेल्या नाहीत’, असे घाटकोपरच्या लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले.

वरळीतील राज्य कामगार विमा रुग्णालय आणि पोद्दार रुग्णालयांमध्ये सकाळी काही मोजकेच लोक लसीकरणासाठी आले होते. त्यामुळे विशेष गर्दी नव्हती, अशी माहिती केंद्रावरील कमर्चाऱ्यांनी दिली.

काही केंद्रांवरच गर्दी

आमच्याकडे नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासून रांगा लावलेल्या होत्या. १०० मात्रा दिल्याने १०० जणांना टोकन दिले आणि बाकीच्यांना मंगळवारी येण्यास सांगितले आहे, असे सांताक्रूझच्या लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले.

आठवडाभरात मुंबईत ६४ हजार जणांचे लसीकरण

गेल्या आठवडय़ापासून मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. १८ ते २२ मे  कालावधीच मुंबईत केवळ ५६ हजार ८४९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, तर शहरातील सरकारी केंद्रांवर या आठवडय़ात केवळ ७,१५८ जणांना लस दिली गेली आहे. यात पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.

लशींचा साठाच पुरेसा नाही

दोन दिवसांपूर्वी ३० हजार मात्रा मिळालेल्या आहेत. लशीच्या उपलब्धतेनुसारच केंद्रे दरदिवशी खुली केली जातात. एका दिवसात ६५ हजार जणांचे लसीकरणही पालिकेने केले होते. त्यामुळे वेगाने लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु साठाच नसल्याने आमच्याकडे पर्याय नाही. ४५ वर्षांच्या दुसऱ्या मात्रेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यास आढावा घेऊन या वयोगटातील पहिल्या मात्रेसाठी खुले केले जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले.