तात्पुरते छप्पर उभारण्यात अडथळा ठरत असल्याने चेंबूरमध्ये एका शाळेच्या आवारातील नारळाची सहा झाडे रसायनांचा वापर करून मारली असल्याची तक्रार एका जागरूक नागरिकाने पोलीस आणि महापालिकेकडे केली आहे.

चेंबूरमधील घाटला गाव परिसरातील एका नामवंत शाळेच्या आवारातील नारळाची झाडे सुकून गेल्याचे समोर आले. त्यानंतर स्थानिक जागरूक नागरिकाने तक्रार केली, मात्र संबंधित शाळेवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

गेल्या वर्षभरापासून शाळेच्या इमारतीची डागडुजी सुरू असून शाळेच्या उजव्या बाजूला छप्पर उभारण्याचे काम सुरू आहे. या कामात नारळाची झाडे अडथळा ठरत होती. त्यामुळे रसायन टाकून ही झाडे मारण्यात आल्याचे बोलले जाते. सध्या ही झाडे पूर्णपणे सुकली असून या झाडांचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्याचे दाखवून ती तोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

एम पश्चिम विभागातील उद्यान विभागाचे अधिकारी नीलेश पवार यांना विचारले असता, ‘याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, मात्र तसा प्रकार घडला असेल तर शाळेवर कडक कारवाई केली जाईल’, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित शाळेने यावर स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.