राज्यभरातील तरुण ‘वक्त्यां’ना भुरळ घालणाऱ्या आणि या वक्त्यांच्या वक्तृत्वाचा कस लावणाऱ्या लोकसत्ता प्रस्तुत ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे विषय जाहीर झाले आहेत. १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची महाअंतिम फेरी १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. प्राथमिक, विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’ निवडला जाणार आहे. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.
आजची तरुण पिढी वेगवेगळ्या विषयांवर खूप विचार करत असते किंवा आजच्या तरुण पिढीला कशाचेच काहीच पडले नाही, अशी दोन परस्परविरोधी विधाने एकाच वेळी ऐकू येतात.
मात्र यातील पहिल्या विधानाला पुष्टी देणारी भाषणे ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या पहिल्या वर्षांत झाली. यंदा आता राज्यभरातील वक्त्यांना पाच विषयांवर प्राथमिक फेरीत आपली मते मांडायची आहेत.
यात ‘धर्म आणि दहशतवाद’,‘इतिहास वर्तमानातला..’, ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?’, ‘बीईंग ‘सेल्फी’श’ आणि ‘मला कळलेली ‘नमो’नीती’ यांचा समावेश आहे.
लोकसत्ता ‘वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेसाठी यंदा ‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ हे सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत. तर ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’ आणि ‘इंडियन ऑइल’ पॉवर्ड बाय ‘वक्ता दशसहस्रेषु’साठी ‘युनिक अकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर असतील. या स्पर्धेकडे महाविद्यालयीन युवक-युवतींबरोबच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्राथमिक फेरी १८ ते २५ जानेवारीपर्यंत
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, अहमदनगर आणि नागपूर या आठ केंद्रांवर या स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ ते २५ जानेवारी या दरम्यान होणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी असेल. तर प्राथमिक फेरीतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरी वरील केंद्रांवर २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान पार पडेल. या आठही केंद्रांवरील अंतिम फेरीत प्रथम आलेल्या आठ वक्त्यांची महाअंतिम फेरी १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.

प्राथमिक फेरीचे विषय
* धर्म आणि दहशतवाद!
* इतिहास वर्तमानातला..
* यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?
* बीईंग ‘सेल्फी’श
* मला कळलेली ‘नमो’निती!

अधिक माहितीसाठी भेट द्या