निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. सगळ्या सार्वजनिक जागा, समुद्र किनारे, पार्क या ठिकाणी जमावबंदीचं कलम लावण्यात आलं आहे. आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हवामान विभागाने निसर्ग या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला आहे. या वादळामुळे होणारा परिणाम लक्षात घेऊन मुंबईत जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलं आहे. पश्चिम किनारपट्टीवर या वादळाचा जोर असणार आहे. त्याच अनुषंगाने हे कलम लागू करण्यात आलं आहे.

अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्यानं आता चक्रीवादळाचं रुप धारण केलं आहे. पुढच्या बारा तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार आहे. इथं वाऱ्याचा वेग १०० ते ११० किमी प्रतितास असेल. तो १२० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती IMD मुंबईच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली आहे. दरम्यान सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी या वादळाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा केली.