|| निलेश अडसूळ

प्राण्यांची संख्या घसरल्याने आणि पर्यटकांची गर्दी ओसरल्याने रया गेलेल्या भायखळ्याची राणीची बाग कात टाकून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. देशविदेशातून आणलेले प्राणी-पक्षी हे या प्राणिसंग्रहालयाचे वैशिष्टय़ असणार आहेच पण त्यासोबतच या प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी बनवण्यात आलेले पिंजरेही पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. वाघासाठी रणथंबोरच्या किल्ल्याची प्रतिकृती, सिंहासाठी गीरच्या जंगलातील कुटी आणि बिबटय़ासाठी ‘वायर रोप’ ही राणीबागेचे आगामी आकर्षण असेल.

राणीची बाग म्हणून सर्वश्रुत असलेल्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’चा लवकरच कायापालट होणार आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याने नव्या प्राण्यांच्या स्वागतासाठी राणीबाग सज्ज होत आहे. या नूतनीकरणानंतर वाघ, सिंह, तरस, अस्वल यांसह आणखी काही प्राणी-पक्षी आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून उभारलेल्या अद्ययावत पिंजऱ्यांसह कात टाकलेल्या राणी बागेचे दर्शन येत्या मार्चअखेर मुंबईकरांना घडणार आहे.

राणीबागेत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून वाघ पाहण्याची वारंवार मागणी के ली जाते. राजस्थानातील रणथंबोर परिसर खास वाघांसाठी म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून राणीबागेत उभारण्यात येणाऱ्या वाघाच्या पिंजऱ्याला रणथंबोर किल्ल्याचे स्वरूप देण्याचे पालिकेने ठरवले.  या किल्ल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून केवळ वाघांची प्रतिक्षा आहे. सिंहासाठी प्रसिद्ध गुजरात येथील गीरचे जंगल डोळ्यांपुढे ठेवून तेथील कुटीप्रमाणे सिंहाचा पिंजरा उभारण्यात आला आहे. बिबटय़ासाठी बनविण्यात आलेला ‘वायर-रोप’ पिंजरा हा आकर्षणाचा विषय ठरू शकेल. अंदाजे पन्नास फू ट उंचीचे, विस्तीर्ण पसरलेले स्टीलचे भव्य खांब तारेच्या साहाय्याने बंदिस्त करून हा पिंजरा उभारला आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आलेला हा भारतातातील पहिला पिंजरा असल्याचेही उद्यान संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.  पिंजऱ्यातून पर्यटकांना बिबटय़ाच्या हालचाली जवळून टिपता येणार आहेत. पिंजऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये प्राण्यांना जंगलाप्रमाणे मुक्त संचार करता येणार आहे.  बसण्यासाठी मचाण, पोहण्यासाठी स्वतंत्र तळेही असणार आहे.

‘अंडर वॉटर व्हिविंग’ तंत्रज्ञान

मगर आणि सुसर यांसाठी खास ‘बंदिस्त स्वरूपाचे तळे’ बांधण्यात येईल. ज्यामध्ये पाण्यात पोहणाऱ्या मगरींचे दर्शन पर्यटकांना घडेल. शिवाय मगरींप्रमाणे इतर प्राण्यांच्याही पाण्यातील हालचाली पर्यटकांना काचेतून पाहता येणार आहे. त्यासाठी खास ‘अंडर वॉटर व्हिविंग’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मुक्त संचारणाऱ्या प्राण्यांमध्ये आणि पर्यटकांमध्ये के वळ एक काचेची भिंत असल्याने प्राण्यांना जंगलात जाऊ न पाहिल्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. या प्रकल्पासाठी पालिकेने एकूण ११० कोटी रुपये खर्च केले असून मार्चअखेर हे नवे उद्यान मुंबईकरांसाठी खुले करण्याचा पालिकेचा मानस आहे.

‘मुंबईकरांसोबत अनेक परदेशी पाहुणेही राणी बाग पाहायला येतात. त्यामुळे ही बाग आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून अधिक सुसज्ज करण्याकडे आमचा कल आहे. नूतनीकरणाचे काम साधारण मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्येकाला राणीच्या बागेत यावेसे वाटेल अशी बाग घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, – डॉ. संजय त्रिपाठी,  उद्यान संचालक, वीरमाता  जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय