26 October 2020

News Flash

ताजच्या जेवणाची मुदत संपल्याने निवासी डॉक्टरांपुढे जेवणाचा प्रश्न!

अधिष्ठात्यांवर आता जेवणाचीही जबाबदारी, डॉक्टरांमध्ये संताप

संदीप आचार्य 
मुंबई: ताज ट्रस्टच्या माध्यमातून २३ मार्चपासून करोनाशी लढणाऱ्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांना मोफत जेवण दिले जात होते. हा करार २३ मे पर्यंत असल्याने यापुढे आपल्याला चांगले जेवण कसे मिळणार असा प्रश्न निवासी डॉक्टर तसेच आरोग्यसेवकांपुढे निर्माण झाला आहे. करोनाशी लढणाऱ्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल असे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी दर्जा व जेवणातील समानतेबाबत निवासी डॉक्टरांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

टाटा ट्रस्टची सामाजिक बांधिलकी मोठी असून करोनाच्या लढ्यात देशभरात ताज किचनकडून रोज सुमारे तीन लाख जेवणाची पाकिटे वाटली जात होती. मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर हॉस्पिटल तसेच कस्तुरबासह प्रमुख रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी रोज सकाळ संध्याकाळ जेवणाची काही हजार पाकिटे दिली जात होती. या जेवणात डाळ- भात, ब्राऊन ब्रेड, योगर्ट, कापलेली फळं तसेच सफरचंद, सॉफ्ट ड्रिंक व पाण्याची बाटली यांचा समावेश होता. गेले दोन महिने ताज किचनचे हे उत्तम दर्जाचे जेवण दिले जात होते. याची मुदत २३ मे रोजी संपणार असली तरी प्रत्यक्षात २५ मे पर्यंत जेवण पुरविण्यात येणार असल्याचे केईएम चे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

केईएम व नायर रुग्णालयातील अधिष्ठाता व प्रमुख डॉक्टरांनी टाटा ट्रस्टच्या या सेवेसाठी त्यांच्या प्रतिनिधींचा मानपत्र देऊन गौरवही केला. मात्र आता आगामी काळात करोनाशी लढणार्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना पालिका असेच दर्जेदार जेवण देणार का असा प्रश्न निवासी डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. एरवीच्या वेळेला रुग्णालयातील कॅन्टीन तसेच घरून येणारे डबे ही डॉक्टर मंडळी जेवत होती. कॅन्टीनमध्ये जेवायचे असल्यास स्वखर्चाने जेवावे लागत होते. मात्र करोनाच्या काळात कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी करोनाची बाधा झाल्याने तसेच कर्मचारी गावी निघून गेल्यामुळे बहुतेक कॅन्टीन बंद पडली होती तर टाळेबंदीमुळे घरून डबा येण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

नेमक्या अशावेळी ताज किचन व टाटा ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत दोन महिने जेवण देण्याचे व्रत चालवले होते. ही मुदत २३ मेला संपणार हे लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने किमान पंधरा दिवस अगोदर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र दोनचार दिवसापूर्वी प्रशानाने आम्हालाच निवासी डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सांगितल्याचे एका अधिष्ठात्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. खरेतर ही जबाबदारी उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून करणे आवश्यक असताना आता करोना रुग्णांवरील उपचाराबरोबर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या भोजनाची जबाबदारीही आम्हालाच घ्यावी लागत आहे. संपूर्ण जगात असे कोठे घडले नसेल असेही या अधिष्ठात्यांनी सांगितले.

एरवी मिरवणारे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्षनेते आता कुठे गायब झाले आहेत, असा सवालही काही ज्येष्ठ डॉक्टरांनी उपस्थित केला. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ‘करून दाखवल्या’ च्या जाहिराती आम्ही भरपूर पाहिल्या मात्र आता गरज असताना करायला कोणी येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रियाही पालिकेतील डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, “केईएमध्ये सकाळ संध्याकाळ मिळून साधारण साडेतीन हजार लोकांच्या जेवणांची गरज आहे. यासाठी आम्ही कॅन्टिन चालकांना कळवले असून स्थानिक पातळीवर एक मोठ्या हॉटेल मालकाशी बोलणे सुरु आहे. ते आम्हाला जेवण पुरवतील” असे डॉ. देशमुख म्हणाले. शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांना विचारले असता “कॅन्टिन सुरु करण्यास आम्ही सांगितले असून एका स्थानिक हॉटेल मालकाने ५०० जेवणाची व्यवस्था देण्याचे कबूल केले आहे तर लंगरमधून काही जेवण येणार आहे. आम्हाला साधारणपणे बाराशे जणांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे ” असे डॉ. भारमल म्हणाले तर “नायर रुग्णालयातही सुमारे अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे ” असे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले.

तसेच पालिका या जेवणाचा खर्च उचलणार की नाही याबाबत तिन्ही अधिष्ठात्यांच्या बोलण्यात एकवाक्यता दिसली नाही. महत्वाचे म्हणजे उद्या कॅन्टिन कर्मचाऱ्यांना पुन्हा करोनाची लागण झाली तर व्यवस्था कोण पाहाणार व अधिष्ठाता म्हणून रुग्ण व रुग्णालय व्यवस्थापन पाहाणार की खानपान सेवा पाहाणार या प्रश्नाचे उत्तरही या अधिष्ठात्यांकडे नव्हते.

जेवणाची व्यवस्था पाहाणे हे अधिष्ठात्यांचे काम आहे का? असा सवाल काही निवासी डॉक्टर व ज्येष्ठ डॉक्टरांनी उपस्थित केला. समजा उद्या वेळेवर जेवण आले नाही व त्याचवेळी आयुक्तांकडे बैठक असली तर अधिष्ठात्यांनी काय करायचे हा सवालही डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता “डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा सर्व खर्च महापालिकाच करणार आहे” असे त्यांनी सांगितले. “यासाठीच्या खर्चाची फाईल आपण दोन दिवसांपूर्वीच मंजूर केली आहे” असेही काकाणी म्हणाले. अधिष्ठात्यांना याबाबतचे सर्व अधिकार दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या क्षणापर्यंत केईएम, शीव व नायरमध्ये आगामी काळासाठीची भोजन व्यवस्थेचे ठोस नियोजन झालेले नसल्याकडे लक्ष वेधले असता आजच्या आज मी स्वत: माहिती घेऊन व्यवस्था मार्गी लागेल याची काळजी घेईन, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 5:15 pm

Web Title: the question of food before the resident doctor after the expiration date of tajs meal scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 दहा वर्षे सीईटी देणारा माणूस…
2 महाराष्ट्र रक्षणसाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
3 राज्यपाल आमचे मार्गदर्शक, मुख्यमंत्र्यांसोबत अतिशय मधुर संबंध – संजय राऊत
Just Now!
X