सिमेंटटंचाई असताना वाढीव सिमेंटकरिता प्रति गोणीमागे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या देणग्या माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना महागात पडल्या आणि पदाचा वापर करीत फायदा उकळल्याचा (क्विड प्रो-क्यो) ठपका न्या. लेंटिन यांनी अंतुले यांच्यावर ठेवला होता. १७ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढय़ानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतुले यांची निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांच्यावरील घोटाळ्याचा डाग शेवटपर्यंत कायम राहिला.
कलाकार, विद्यार्थी यांच्या मदतीकरिता अंतुले यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानची स्थापना केली होती. अंतुले मुख्यमंत्रिपदी असताना सिमेंटटंचाई निर्माण झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारात वाढीव सिमेंट तेव्हा उपलब्ध करून देण्यात आले होते. वाढीव सिमेंटच्या बदल्यात इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी अंतुले यांनी देणग्या जमा केल्या, साखर कारखान्यांना प्रति गोणीमागे दोन रुपये देणग्या वसूल केल्या, बिल्डरांना वाढीव सिमेंट देताना त्यांच्याकडून देणग्या वसूल केल्या गेल्या, अशा प्रकाराचे आरोप त्यांच्यावर झाले होते. सिमेंट पोत्याच्या बदल्यात देणग्या वसूल करण्याच्या अंतुले यांच्या निर्णयाच्या विरोधात पा. बा. सामंत आणि रामदास नायक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंतुले यांनी ३० कोटी रुपयांचा निधी जमा केल्याचा आरोप झाला होता.
प्रतिष्ठानसाठी देणग्या या धनादेशाच्या माध्यमातूनच घेण्यात आल्या होत्या, असा दावा अंतुले यांनी केला होता. तर अंतुले यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी देणग्यांसाठी रोख रक्कमही जमा केल्याचा आरोप केला होता. इंदिरा गांधी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे निधी जमा करीत असल्याचा आरोप झाला होता. या देणग्यांशी इंदिरा गांधी यांचेही नाव जोडले गेले. मुख्यमंत्रिपदी अंतुले यांची निवड करण्यास काँग्रेसमध्ये विरोध झाला होता. सारे प्रस्थापित नेते अंतुले यांच्या विरोधात होते. संधी येताच या नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या. आपले नाव जोडले गेल्याने इंदिरा गांधी संतप्त झाल्या आणि अंतुले यांना राजीनामा  द्यावा लागला.
पदाचा गैरवापर करीत फायदा उकळल्याचा ठपका उच्च न्यायालयाचे न्या. लेंटिन यांनी अंतुले यांच्यावर ठेवला होता. या निर्णयाच्या विरोधात अंतुले यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. १७ वर्षांच्या कायदेशीर लढय़ानंतर अंतुले यांना सर्वोच्च न्यायालयाने यांची निर्दोष मुक्तता केली. पण सिमेंट घोटाळ्यामुळे एकेकाळी काँग्रेसच्या राजकारणात वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंतुले यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टातच आली.
अंतुले आणि देवरा..
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुरली देवरा यांच्या निधनाला आठवडा होत नाही तोच माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले या काँग्रेसच्या दुसऱ्या बडय़ा नेत्याचे निधन झाले. या दोन्ही नेत्यांचे विळ्याभोपळ्याचे संबंध होते. देवरा अध्यक्षपदी असेपर्यंत मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात पाय ठेवणार नाही, असे अंतुले यांनी जाहीर केले होते. देवरा यांनी २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. त्यांना पदावरून दूर केल्यावर गुरुदास कामत यांची अध्यक्षपदी निवड झाली.  कामत यांनी पदभार स्वीकारल्यावर अंतुले हे मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आले व त्यांनी शब्द खरा केल्याची आठवण सांगितली होती.
पक्षाची अनास्था
अंतुले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पक्षाच्या मुख्यालयात ठेवण्याची कोणतीच तयारी करण्यात आली नव्हती, अशी खंत अंतुले यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा