प्रतिबंधात्मक नियम पाळून कर्तव्य बजावण्याच्या सूचना

मुंबई : लसीकरणामुळे राज्यात दुसरी लाट उसळली असली तरी पोलिसांमधील बाधितांचे प्रमाण तुलनेने कमी असून  करोना प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रेनंतर पोलीस दलातील संसर्गाचा प्रादुर्भाव थोपवणे शक्य होईल, असा विश्वास मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तरीही गाफील न राहता पूर्वीप्रमाणेच आवश्यक काळजी घेऊन कर्तव्य बजावण्याची सूचना आयुक्तालयाने पोलिसांना दिली आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत सर्वसामान्यांच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या राज्य पोलीस दलात संसर्ग वेगाने पसरला. पहिल्या लाटेत जमावबंदी, संचारबंदी, टाळेबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर होती. मात्र हळूहळू पोलिसांवरील जबाबदारी वाढली. विलगीकरण केंद्रांची सुरक्षा, विलगीकरणातील रुग्ण पसार होऊ नयेत, पसार झालेल्यांच्या शोधासह, परप्रांतीय मजुरांची पाठवणी राज्य पोलीस दलाच्या खांद्यावर सोपवण्यात आली. एकीकडे करोनाबाधित अधिकारी, अंमलदारांची संख्या वाढल्याने त्यांच्या अनुपस्थितीत उपलब्ध मनुष्यबळावरील कामाचा ताण वाढला. टाळेबंदीमुळे असलेली निर्बंध पाळून घर ते पोलीस ठाण्यापर्यंतचा रोजचा प्रवासही पोलीस दलाला दमवणारा ठरला. सध्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीच्या अंमलबजावणीसह इतर वेळेत गर्दी होऊ नये याची खबरदारी घेणे, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई आणि प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र यंदा बहुतांश पोलिसांचा लसीकरणचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून पोलीस दलातील बाधितांचे प्रमाण कमी होऊ लागले. गेल्या वर्षी दर दिवशी शंभर ते दोनशे अधिकारी, अंमलदार बाधित होत होते. ते प्रमाण आता १० वर आले आहे. सध्या अतिदक्षता विभागात किं वा व्हेंटिलेटरवर एकही बाधित पोलीस नाही.

गेल्या वर्षी हजारो पोलीस बाधित

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत ३० हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित झाले. तर साधारण तीनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. बाधितांमध्ये ४५ वर्षांवरील पोलीस अधिक होते. संसर्ग प्रसाराचा वेग पाहता ५५ वर्षांपुढील अंमलदारांना सुटी देण्यात आली. ५० पेक्षा जास्त वय आणि मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आदी विकार असलेल्या अधिकारी, अंमलदारांनाही सवलत जाहीर करण्यात आली होती.

पोलीस दलावर दुसऱ्या लाटेचा परिणाम तूर्तास जाणवलेला नाही. मात्र, आवश्यक काळजी घेऊन कर्तव्य बजावण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

– यशवंत व्हटकर, सहआयुक्त (प्रशासन)