देवनार कचराभूमीवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली असून कचरा कंत्राटाची विशेष चौकशी पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर आरोप होत असल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी देवनारमध्ये लागत असलेल्या आगीची पोलीस उपायुक्त किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली.
नालेसफाईवरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार आणि शिवसेनेत जुंपली होती. आता कचरा कंत्राटामध्ये गैरव्यवहार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून सूत्रधारांना उजेडात आणण्यात येईल, असे आव्हान शिवसेनेला दिले आहे. मुंबईत सहा-सात हजार टन कचरा गोळा होत असून प्रत्यक्षात १० ते ११ हजार टन कचरा उचलणे व वाहतुकीसाठी पैसे उचलले जातात, असा आरोप त्यांनी केला आहे. सोमय्या यांनी देवनार कचराभूमीच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनामुळे आणि शिवसेनेला ‘लक्ष्य’ केल्याने प्रचंड अस्वस्थता आहे.