पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्यात त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान भारतासंदर्भातले महत्वाचे विषय मोदींनी जिनपिंग यांच्यासमोर मांडले नाहीत, असा आरोप करीत शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. या दौऱ्यासाठी कुठलाही निश्चित अजेंडा नसल्याचे सांगत यातून तुम्ही नक्की काय साध्य केले? असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींना फटकारण्यात आले आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासमोर मोदींनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी), अरुणाचल प्रदेशमध्ये चीनकडून होत असलेली घुसखोरी, डोकलाम वाद, उत्तराखंड आणि लडाख घुसखोरी यांसारखे महत्वाचे विषय का मांडले नाहीत, असा सवाल शिवसेनेने केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा दोन दिवसीय चीन दौऱा आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट ही अनौपचारिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीन हा पाकिस्तानचा मोठा समर्थक आहे. भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला चीनचा पाठींबा असल्याचे मोदींनी चीन दौऱ्यात शांत राहणे योग्य वाटते का? असे शिवसेनेने म्हटले आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमी कॉरीडॉरवर मोदी बोलले नाहीत. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) जातो. मनमोहनसिंग सरकारने यापूर्वी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. चीनसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, अशी आठवण या अग्रलेखातून करुन देण्यात आली.

या दौऱ्यादरम्यान कुठलेही वादग्रस्त मुद्दे उपस्थित करण्यात आले नाहीत, असे स्पष्टीकरण परराष्ट्र सचिवांनी दिल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. त्यामुळे मोदींनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान नक्की काय केले? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.

मोदींनी पुन्हा जवाहरलाल नेहरू यांच्या पंचशील धोरणांचा अवलंब केला आहे का? नेहरुंनी भारत-चीन युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चीनसोबत पंचशील (पाच मुद्दे) धोरणांचा अवलंब केला होता. मात्र, नेहरूंचे हे धोरण भारताला महागात पडले होते. मोदी हे नेहरूंवर टीका करण्याची संधी कधीही सोडत नाहीत. मात्र, आज त्यांनी चीनशी संवाद साधताना त्यांचेच धोरण अवलंबले. त्यामुळे एका अर्थाने त्यांनी पंचशील धोरणांना पाठींबाच दर्शवला आहे. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय म्हणणे आहे, असा सवालही शिवसेनेने केला आहे.

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यासोबत चर्चेदरम्यान मोदी म्हणाले की, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध सुधारत आहेत. जर आपण पंचशीलाचा मार्ग अवलंबला तर त्याचे जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीमध्ये रुपांतर होईल.