शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा आरोप
देवनार कचराभूमीत डेब्रिज टाकण्यास न्यायालय आणि राज्य सरकारने केलेली मनाई, तळोजा व ऐरोली येथील कचराभूमीस परवानगी देण्यास केंद्र व राज्य सरकारकडून झालेला विलंब आदी विविध कारणांमुळे देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा प्रकल्प रखडला. या कचराभूमीच्या आजच्या स्थितीस केवळ शिवसेना नव्हे, तर राज्य, केंद्र सरकार आणि न्यायालय जबाबदार आहे, असा आरोप करीत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सोमवारी भाजपला चपराक लगावली.
पूर्वी देवनार कचराभूमीत डेब्रिज टाकण्यात येत होती. मात्र न्यायालय आणि राज्य सरकारने तेथे डेब्रिज टाकण्यास मनाई केली. तेथे केवळ कचरा टाकण्यात येत होता. या कचऱ्यातून तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळे आगीचे प्रमाण वाढले. तसेच कचरा वेचणाऱ्या लोकांकडून तेथे आगी लावण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
देवनार आणि मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे गरजेचे आहे. देवनारची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा आणि ऐरोली येथे कचराभूमी सुरू करण्यास परवानगी मिळणे गरजेचे आहे. परंतु केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. भाजप नेत्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा आणि मगच शिवसेनेला जबाबदार धरावे, असा टोला राहुल शेवाळे यांनी हाणला. मुंबई महापालिका, केंद्र व राज्य सरकार आणि न्यायालयाचे निर्णय यांचा समन्वय साधला गेला तरच मुंबईतील कचराभूमींचा प्रश्न सुटू शकेल, असेही ते म्हणाले.