रसिका मुळ्ये
मुंबई : व्यवस्थापन अभ्यासक्रमाची (एमबीए) प्रवेश परीक्षा गेली दहा वर्षे देणारे आणि दरवर्षी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारे शशांक प्रभू यंदाच्या परीक्षेत पहिले आले आहेत. विद्यार्थी म्हणून २०१० मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी मिळवलेले गुण हे एमबीए सीईटीच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक गुण आहेत.

व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल प्रवेश नियमन प्राधिकरणाने शनिवारी जाहीर केला. या परीक्षेत डोंबिवली येथील शशांक प्रभू हे २०० पैकी १५९ गुण मिळवून पहिले आले आहेत. गेली दहा वर्षे प्रभू एमबीए सीईटी देत आहेत. २०१० मध्ये त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सीईटी दिली. त्यावेळीही २०० पैकी १७९ गुण मिळवून ते राज्यात पहिले आले होते. एमबीए सीईटीच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे १७९ गुण सर्वाधिक ठरले आहेत.

त्यावेळी मुंबईतील कोणत्याही संस्थेत त्यांना सहज प्रवेश मिळाला असता. मात्र, तरीही अधिक चांगली संस्था मिळावी म्हणून राष्ट्रीय प्रवेश परीक्षांबरोबरच २०११ मध्ये त्यांनी पुन्हा सीईटी दिली. त्यावेळीही पहिल्या दहा दहामध्ये त्यांना स्थान मिळाले आणि राष्ट्रीय प्रवेश परीक्षेतील उत्तम गुणांमुळे दिल्ली विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रम विभागात प्रवेश मिळाला. तेथून २०१३ मध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विविध प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन सुरू केले. तेव्हापासून विद्यार्थी म्हणून नाही पण मार्गदर्शक म्हणून ते परीक्षा देतात आणि पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवतात. २०१६ मध्येही १६५ गुण मिळवून ते राज्यात पहिले आले होते.

“परीक्षेत काय बदल होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी मी परीक्षा देतो. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांची तयारी करून घेताना होतो. सीईटी बरोबरच कॅट आणि इतरही परीक्षा देतो. मात्र, मी परीक्षा दिल्यामुळे कुणाही विद्यार्थ्यांची संधी जाणार नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशाच परीक्षा देतो. या परीक्षा देणे मलाही आव्हान वाटते” असे प्रभू यांनी सांगितले.

प्रवेश नियमन प्राधिकरणाने १४ आणि १५ मार्चला एमबीए सीईटी घेतली होती. यंदा दहिसर येथील अंकित ठक्कर (१५५ गुण) हा दुसरा तर उत्तर प्रदेश येथील आकांक्षा श्रीवास्तव (१५३ गुण) ही तिसरी आली आहे. यंदा या परीक्षेसाठी १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.