रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असे जाहीर केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण पोलिसांनी एक पाच टप्प्यांची गुप्त योजना आखून राज ठाकरे यांचे मनसुबे उधळून लावले. मंगळवारी रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक झाली. त्यात ही योजना ठरविण्यात आली.
पहिली पायरी
दादर हा मनसेचा बालेकिल्ला आहे. शिवाजी पार्क येथील घरातून राज यांना ताब्यात घेतले असते तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे राज यांना दादरमधून बाहेर येऊ द्यायचे ही या गुप्त योजनेची पहिली पायरी होती. परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य) प्रवीण साळुंखे या दोनच अधिकाऱ्यांना या योजनेची माहिती होती. त्यानुसार राज यांना शांतपणे घरातून निघाले. ठरल्याप्रमाणे उपायुक्त कुलकर्णी सोबत होते.
दुसरी पायरी
राज यांना वाशी टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्यावर ज्या ठिकाणी ताब्यात घ्यायचे ती जागा मोकळी असायला हवी होती. राज यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला असता. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी सायन महामार्गाजवळील (चुनाभट्टी) ही जागा निवडण्यात आली होती. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यातील कुणालाही शेवटपर्यंत काय करायचे ही कल्पना नव्हती. राज यांनी शिवाजी पार्क सोडल्यानंतर या सर्वाना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या.
तिसरी पायरी
प्रत्यक्ष राजना अडवून ताब्यात घेण्याची जबाबदारी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण साळुंखे यांच्यावर होती. शीव महामार्गावर अचानक हा ताफा अडविण्यात आला. राज यांना हे अनपेक्षित होते. त्यांच्यासोबत असलेलेले आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी सुरुवातीला वाद घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलीस ऐकत नाहीत म्हटल्यावर ‘इथेच आंदोलन करू द्या’ अशी विनवणी ते करू लागले. पण साळुंखे आणि कुलकर्णी यांनी कडक भूमिका घेतल्यावर नांदगावकर यांनी ठाकरे यांना गाडीतून उतरून व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. राज ठाकरे कसलाही प्रतिकार न करता सरळ गाडीत जाऊन बसले. राज रस्त्यावर बसतील या अपेक्षेने काही उत्साही कार्यकर्ते रस्त्यावर बसू लागले. पण स्वत: उपायुक्त कुलकर्णी यांनी एकेकाला उचलून गाडीत कोंबले. त्यामुळे नंतर कुणी तसा प्रयत्न केला नाही. हे सर्व घडत असताना राज ठाकरे एकदम शांत बसून होते.
चौथी पायरी
राज ठाकरे यांना पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेणे सोपे नव्हते. राज यांना कुठे नेले जाणार हे कुणालाही माहीत नव्हते. पोलिसांनी ठाकरे यांची व्हॅन पुढे ठेवली आणि चेंबूरच्या प्रियदर्शनी पार्क येथे बॅरिकेड्स लावून इतरांच्या गाडय़ा अडविल्या. फक्त राज यांची व्हॅन पुढे काढली. त्यामुळे फक्त राज ठाकरे यांना विनासायास पुढे नेण्यात पोलिसांना यश आले.
पाचवी पायरी
राज यांना ताब्यात घेतल्यावर कुठल्या पोलीस ठाण्यात न्यायचे हा प्रश्न होता. त्या ठिकाणी मोकळी जागा असावी आणि ते थोडे आडमार्गावर असणे आवश्यक होते. त्यानुसार आर.सी.एफ. पोलीस ठाण्याची निवड झाली. या ठिकाणी नवीन दोन मजली इमारत आहे. शिवाय आत मोठी मोकळी जागा आहे. त्यामुळे राज यांना या पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळे नंतर आलेल्याकार्यकर्त्यांना बाहेर घोषणाबाजी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
कुलकर्णी, साळुंखे ‘हीरो’ ठरले
प्रभारी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि सहपोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी ही गुप्त योजना बनविली आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण साळुंखे आणि उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्यावर सोपवली होती. राज ठाकरे यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याला रस्त्यात अडवून पोलीस ठाण्यात आणण्याचे शिवधनुष्य या दोन्ही अधिकाऱ्यांनी लीलया पेलले. हे काम अवघड होते. मात्र वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आणि सहकाऱ्यांच्या मदतीने ते पार पाडण्यात यशस्वी ठरलो, असे प्रवीण साळुंखे यांनी सांगितले. या संपूर्ण ‘ऑपरेशन’ला कुठेही गालबोट लागले नाही हेच आमचे यश होते असे उपायुक्त कुलकर्णी म्हणाले.