गेल्या पंधरा दिवसांपासून औरंगाबाद शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यात सरकारला यश आले असून या कचराकोंडीवर तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे. कचराप्रश्नावरुन बुधवारी औरंगाबादेत हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर तोडगा सुचवला असून शहरातील कचरा हा खदान भागात टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांना दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने औरंगाबाद महापालिकेला कचरा डंपिंगसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शिवसेना नेत्यांनी बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडे केली. ती मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा शोधण्याचे आदेश दिले असून या कचराकोंडीवर तात्पुरता तोडगाही सुचवला आहे. त्यानुसार, खदान भागात कचरा टाकण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, बुधावीर औरंगाबादमधील कचराप्रश्नाने भडका घेतला, दुपारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत ९ पोलीस जखमी झाले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. औरंगाबाद- मुंबई महामार्गावरील मिटमिटा गावाजवळ स्थानिकांनी आंदोलन केले. संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केले, यात ९ पोलीस जखमी झाले.

शहरात साचणारा तब्बल ६११ टन कचरा उचलून तो कांचनवाडी, मिटमिटा भागात टाकण्यात होता. मिटमिटा येथील ग्रामस्थांचाही कचरा टाकण्यास विरोध दर्शवला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देखील मिटमिटा येथे कचरा टाकण्यासाठी आलेल्या सात-आठ वाहनांपैकी एक गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तर पैठण रोडवरील कांचनवाडीजवळ एसटीसह काही वाहनांवर दगडफेक झाली.

औरंगाबाद शहराजवळील नारेगाव परिसरात गेल्या ३० वर्षांपासून कचरा टाकला जात होता. कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यामुळे साठलेल्या कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे. तो अंदाजित २० लाख मेट्रिक टन एवढा असावा, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यावर बायोमायनिंगचा प्रयोग केला जावा. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असे शासनाने नुकतेच सांगितले. १५ दिवसांपूर्वीच ४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव त्यासाठी तयार करण्यात आला असून या प्रस्तावाची उच्चाधिकार समितीमार्फत छाननी झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे.

महापालिकेकडून ३०६ वाहनांद्वारे कचरा टाकला जातो. गेल्या १५ दिवसांपासून तो कचरा डेपोपर्यंत जात नाही. परिणामी १३८ वाहनांमध्ये ४२१ टन कचरा भरलेला आहे. दोन हजार टन कचरा रस्त्यावर पडलेला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी शहरातून गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी कांचनवाडी परिसरात गेलेल्या वाहनांना नागरिकांनी अडवले होते.