गेल्या वर्षी जुलै महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला दोन कोटी ७० लाख रुपयांचा गुटखा परत मिळवा यासाठी किर्ती इंडस्ट्रीज कंपनीने दाखल केलेली याचिका आता सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे. त्यामुळे हा गुटखा आता नष्ट करण्यात येणार आहे.
किर्ती इंडस्ट्रीजतर्फे एका नामांकित कंपनीचा गुटखा परराज्यात विक्रीसाठी पाठविण्यात येत होता. या वेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू येथे कारवाई करून हा गुटखा जप्त केला होता. यामुळे प्रशासनाच्या कारवाईविरोधात कंपनीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरत ही याचिका फेटाळून लावली. यामुळे आता हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नष्ट करण्यात येणार आहे. सध्या गुटख्याचा हा साठा मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात ठेवण्यात आला असून तो नष्ट करण्यासाठी पुणे येथे पाठविणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.