मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय बंगल्याचे पाणी बिल थकीत नाही असा अहवाल आता मुंबई महापालिकेने दिला आहे. वर्षा या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी असलेला तोरणा बंगला या दोन्हीची थकबाकी निरंक आहे असं महापालिकेने म्हटलं आहे. आजच माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली होती. मात्र मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची पाणी बिलाची थकबाकी नाही असा अहवाल दिला आहे.

 

 

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

माहितीच्या अधिकारात काय माहिती आली होती?

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर) यांचाही समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचं समोर आलं होतं पण आता मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांची पाणी बिल थकबाकी नाही असं स्पष्ट केलं आहे.