राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटल्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही पक्षांमधील प्रत्येकाचे हट्ट, छंद, आवडीनिवडी हे सर्व सांभाळताना फार मोठी कसरत करावी लागते, ती कसरत पूर्ण झाली आहे व आता सर्कस कामाला लागली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

आता खातेवाटप किंवा मंत्रिमंडळ विस्तार हे सर्व झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याला शांत झोप लागेल. मंत्रिमंडळ कामाला लागेल लोकांचे प्रश्न सुटतील. आमचं काम झालं आम्ही मोकळं झालो. टीका ही होतचं असते, महाविकासआघाडी आहे. तीन पक्ष आहेत, तिन्ही पक्षांचे तीन नेते आहेत. यातील एका पक्षाच हायकमांड दिल्लीत असल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना सातत्याने दिल्लीत जावं लागतं. याद्या घेऊन, मंजुरीसाठी अन्य काही छोटेमोठे प्रश्न घेऊन. बाकी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतच आहेत. तरीही तिन्ही पक्षांमधील लोकं काही अपक्ष प्रत्येकाचे हट्ट,छंद, आवडीनिवडी हे सर्व सांभाळताना फार मोठी कसरत करावी लागते, ती कसरत पूर्ण झाली आहे. आता सर्कस कामाला लागली आहे, असे राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मलाईदार खातं हा शब्द मला मान्य नाही. कोणाला मलाई खायचीच असेल तर तो कुठेही खाऊ शकतो. प्रत्येकाकडे महत्वाची खाती आहेत. प्रत्येक खातं हे राज्याच्या दृष्टीने महत्वाचं असतं.लोकांच्या दृष्टीने महत्वाचं असतं. शिवसेनेकडे संपूर्ण खात्याचा बाप म्हणजे मुख्यमंत्रीपद आहे. कोणत्याही खात्यासंदर्भातील अंतिम निर्णयाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडेच असतो. त्यामुळे खाती वाटपाबाबत आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. काँग्रेसला ४४ जागा आहेत, तरी त्या तुलनेत काँग्रेसला सत्तेत महत्वाचा वाटा मिळाला. महत्वाची खाती त्यांच्याकडे देखील आहेत. राष्ट्रवादीचे देखील ५४ आमदार आहेत व हे सर्व घडवण्यात शरद पवार यांच योगदान आहे. त्यांच्यकडे देखील वरिष्ठ लोकं आहेत, जर त्यांनी त्यानुसार महत्वाची खाती घेतली असतील, तर मला असं वाटतं की तिघांची वाटणी ही समसमान झालेली आहे. अन्याय कोणावरही झालेला नाही. आघाडीचं सरकार चालवण्यासाठी देवाणघेवाण, तडजोड करावी लागते व ही आघाडीत सहभागी असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी असते.